शरद पवार बुक फेस्टची सांगता
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदी फाऊंडेशनच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून येथे सुरू असलेल्या बुक फेस्ट पुस्तक प्रदर्शनास नगरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. चार दिवसांत तब्बल ४५ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांची येथे विक्री झाली. ही उलाढाल ५० लाखांच्या वर असल्याचे सांगण्यात आले.
सावेडीतील जॉगिंग पार्कमध्ये आयोजित या प्रदर्शनात राज्यातील नामवंत प्रकाशकांची पुस्तके विक्रीस उपलब्ध होती. याविषयी बोलताना आदी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव राजळे म्हणाले की, नगरकरांना अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देत नव्या पिढीला जुन्या पिढीचा इतिहास जवळून कळावा, हा हेतू यामागे आहे. यानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात अभिनेते महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, उद्योजक विठ्ठल कामत, मिलिंद गुणाजी, संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांच्या मुलाखती झाल्या. त्यासही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे राजळे म्हणाले.
प्रदर्शनास भेट दिल्यानंतर ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब शिंदे म्हणाले की, मानवी जीवनात ग्रंथांचे अमोल स्थान असून ग्रंथ माणसाला जगायला, बोलायला व वाचायला शिकवतात. या उपक्रमाबद्दल त्यांनी राजळेंचे कौतूक केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागात असा उपक्रम राबवून साहित्याशी नगरचं नातं दृढ करण्यामध्ये राजळे यांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले.
मेहता, संस्कृती, पद्मगंधा, राजहंस, डायमंड, युनिक आदी नामवंत प्रकाशकांनी पुस्तकांचा हा खजिना नगरकरांसाठी उपलब्ध करून दिला. पुस्तक विक्रीचा हा उच्चांक असल्याचे फाऊंडेशनचे सचिव किशोर मरकड यांनी सांगितले.     

Story img Loader