लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकीय मित्र आज त्याच मित्राचे उणेदुणे काढत आहेत. याचा प्रत्यय जाहीरसभांमध्ये पनवेलच्या मतदारांना पहायला मिळत आहे.  
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचा खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रामशेठ ठाकूर यांच्या घराचे उंबरठे झिजवत होते. याच तटकरे यांनी आंबेडकर भवनाच्या उदघाटनावेळी ठाकूर पितापुत्रांची जाहीर स्तुती  होती. मात्र आघाडीचा घटस्फोट होताच हेच ठाकूर पिता-पुत्र कंत्राटे मिळविण्यासाठी पक्षांतर करीत आहेत, असा आरोप करीत आहेत. खांदेश्वर येथे रविवारी झालेल्या सभेत तटकरे यांनी ठाकूरांवर तोफ डागली.
कामोठे येथे झालेल्या सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपची महायुती तोडली असा आरोप केला. कालपर्यंत हेच जानकर टीव्ही चॅनेलवरुन ही महायुती अभेद्य राहण्यासाठी प्रयत्न करत होते. ते जानकर भाजपसोबत गेल्यावर शिवसेनेच्या नेत्यांवर घसरताना दिसतात. असाच काहीसा सूर रिपाइंचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या भाषणातून सध्या ऐकायला मिळत आहे. गायकवाड हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेकापसोबत होते. शेकापच्या व्यासपीठावर ते कॉंग्रेस व रामशेठ ठाकूर यांच्यावर जहाल टीका करत दिसत होते. मात्र पक्षीय धोरणे बदलल्याने सध्या गायकवाड हे ठाकूरांचे स्टार प्रचारक आहेत. सध्या गायकवाडांचा उपयोग ठाकूर त्यांच्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी करीत आहेत.  एकूणच पनवेलचे राजकारण ठाकूर यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी शेकापची धुरा ठाकूर सांभाळत होते. आता त्यांनी भाजप प्रवेश केल्याने भाजप पक्ष वाढेल का पुन्हा ठाकूरभक्त वाढतील असा प्रश्न पडला आहे. शेकापक्ष हा निष्ठावंत असल्याचा बोलबाला करतो. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत शेकापमध्ये आलेले लक्ष्मण जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकून आता विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवली आहे.

Story img Loader