दिवाळीच्या सलग सुट्टया व शेतकऱ्यांची शेतमाल विकण्याची धावपळ, या पाश्र्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा या महिन्यातील विदर्भ दौरा रद्द करण्यात आला आहे.
शरद पवार यांचा १६ व १७ नोव्हेंबर असा दोन दिवसीय विदर्भ दौरा ठरला होता. या दौऱ्यात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बडनेरा व अकोला याठिकाणी त्यांचे कार्यक्रम निश्चित झाले होते. गत सप्टेंबर महिन्यात त्यांनी याच ठिकाणी कार्यक्रम दिले होते. तो दौरा रद्द झाल्याने या सगळया आयोजकांना या नोव्हेंबरच्या दौऱ्यात तारखा देण्यात आल्या. मात्र आज प्राप्त माहितीनुसार हा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडयातील दौराही रद्द करण्यात आला.
विशेष म्हणजे दौरा रद्द व्हावा, यासाठी बहुतांश आयोजकांनीच पुढाकार घेतला होता. दिवाळीच्या सुट्टया हे एक प्रमुख कारण त्यामागे होते. पवारांचे कार्यक्रम मोठया प्रमाणात यशस्वी करण्यासाठी श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती लावणे, ही सुट्टयांच्या पाश्र्वभूमीवर आयोजकांसाठी डोकेदुखी ठरणार होती. बहुतांश आयोजकांच्या ताब्यातील शिक्षण व सामाजिक संस्थांतील मनुष्यबळ हा श्रोत्यांच्या हजेरीतील मुख्य वाटा असतो. दिवाळीमुळे हा कर्मचारी वर्ग उपस्थित राहण्याची शक्यता धूसर होती. शिवाय ग्रामीण भागातही दिवाळीतल्या पाहुण्यांची सरबराई व शेतमालाची खरेदीविक्रीची याच काळात धुमधाम असते.  अशा काळात गर्दी आणायची कुठून? असा प्रश्न पडलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी हा दौरा रद्द व्हावा, म्हणून स्वत:च धावपळ आरंभली. पक्षाच्या विदर्भातील मंत्र्यांनी पुढाकार घेतला. पुसद येथील कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर अन्य नेतेही कामाला लागले. आज सकाळी हे नेते प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांना दौरा रद्द करण्याची विनंती करण्यास गेले. त्यावेळी चर्चा सुरू असतांनाच शरद पवारांच्या दिल्ली कार्यालयातून पिचडांकडे दूरध्वनी आला. साहेबांनी विदर्भ दौरा रद्द केल्याची बातमी ऐकली अन् उपस्थितांचा जीव भांडयात पडला. मुंबईहून ‘लोकसत्ता’शी बोलताना आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी दौरा अधिकृतपणे रद्द झाल्याची माहिती दिली.
प्रारंभी दौऱ्याच्या तारखा बदलण्यासाठी खटपट करणाऱ्या पक्षाच्या विदर्भातील नेत्यांना दौराच रद्द झाल्याचे कळताच दिलासा मिळाला आहे. पवारांचा कार्यक्रम मिळावा म्हणून धडपड करणाऱ्या नेत्यांना दिवाळीचा हंगाम पाहून दौरा रद्द करण्याची गळ घालावी लागली, हा एक अपवादच ठरल्याचे म्हटले जाते. 

Story img Loader