ठाणे शहरापासून अत्यंत जवळचे नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या येऊरच्या जंगलात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता जरा जास्त कात्री लागणार आहे. काल-परवापर्यंत कागदावरच असलेल्या येऊरच्या पर्यटन शुल्काची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून या शुल्कातही दहा टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच दररोज सकाळी फिरण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांना वार्षिक पाससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या येऊर परिसराला विस्तीर्ण असे जंगल लाभलेले आहे. स्थानिक परिसरातील नागरिक दररोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायामासाठी येत असतात. त्यातच येऊरमध्ये अलीकडच्या काळात वाढलेले बंगले, फार्म हाऊस आणि हॉटेल्स यांच्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची वर्दळही येथे होत असते. या पाश्र्वभूमीवर या ठिकाणी पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय वनविभागाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, पर्यटकांकडून घातली जाणारी हुज्जत, स्थानिकांचा विरोध अशा कारणांमुळे याची अंमलबजावणी क्वचितच होत होती. मात्र, आता वनविभागाने सक्तीने पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. शिवाय, पर्यटन शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
वनविभागाने शुल्क लागू केल्यामुळे ‘मॉर्निग वॉक’करिता जाणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागत होते. याला विरोध झाल्यामुळे वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली. या वार्षिक पासच्या दरांतही आता दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
नीलेश पानमंद, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा