युरो-डॉलरचे भाव खूपच वाढल्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपऐवजी पर्यटक मोठय़ा संख्येने श्रीलंका, मालदिव तसेच देशातच अंदमान, केरळ, राजस्थानकडे पर्यटक वळले आहेत. ‘‘युरोप-अमेरिकेचा सीझन सप्टेंबपर्यंत असतो. त्यामुळे त्यासाठी काही महिने आधी बुकिंग केलेल्या पर्यटकांना काही प्रश्न आला नाही. मात्र जे विचार करत होते ते थोडे मागे हटले. युरो-डॉलरच्या दराबाबत साशंकता असल्याने ती योजना पुढे ढकलून त्याऐवजी कमी बजेटची आग्नेय आशियातील पर्यटन स्थळे निवडली जात आहेत. यावेळी इजिप्तला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र ग्रीस-टर्कीकडे पर्यटक वळले, दुबई विथ क्रूझ, क्रूझ हॉलिडे, सायकलिंग टूर, जंगलसफारी अशा साहसी सहलींची संख्याही वाढते आहे,’’ अशी माहिती केसरी टूर्सच्या संचालक झेलम चौबळ यांनी दिली. भारतातून आंतरराष्ट्रीय स्थळी जात असलेल्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा पाच ते सात टक्के घट झाली असली तरी हे साशंक पर्यटक पुढच्या वर्षी पुन्हा युरोप-अमेरिकेकडे वळतील असे त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे बेत पुढच्या वर्षी ढकलले गेल्याने यावेळी देशांतर्गत व राज्यांतर्गत पर्यटनाची मागणी वाढली आहे. देशांतर्गत स्थळांमध्ये नेहमीच्या आवडत्या केरळ-राजस्थानसोबत अंदमानला पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अंदमानला जाणाऱ्यांमध्ये मराठी आणि गुजराती पर्यटकांची संख्या अधिक आहे, अशी माहिती अंकुल टूर्सचे राजीव चावक यांनी दिली.

Story img Loader