विकासकामांसाठी ३ कोटींचा निधी
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील विविध विकासकामांसाठी ३ कोटींचा निधी देण्याचा निर्णय ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देशी पर्यटकांना हत्तीची सफारी १५० रुपये तर विदेशी पर्यटकांना १८०० रुपये इतकी महागली असून गाइडला प्रतिफेरी दोनशेऐवजी ३०० रुपये व कॅमेरासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जिल्हय़ाचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री संजय देवतळे, वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी, सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा, ताडोबाचे प्रकल्प संचालक वीरेंद्र तिवारी, सदस्य सचिव गिरीश वशिष्ठ उपस्थित होते. वनमंत्री कदम यांनी सर्वप्रथम ताडोबा प्रकल्पाचा वर्षभराचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पावरील बंदी उठविल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने पर्यटनाच्या माध्यमातून १ कोटी ७० लाख रुपये गोळा केले आहे. हा सर्व निधी ताडोबा प्रतिष्ठानच्या खात्यात जमा झाला असून येत्या वर्षभरात प्रकल्पात विविध विकासकामे घेण्याकरिता ३ कोटींच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या तीन कोटींतून ताडोबात इको टुरिझम व इतर कामे घेतली जाणार आहेत. यासोबतच ताडोबातील पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी येत्या काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा अधिक व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा या बैठकीत चर्चा झाली. उन्हाळय़ाच्या काळात ताडोबात पानवठय़ांची दुरुस्ती तसेच नवीन पानवठे तयार करणे यासोबतच बचाव केंद्र तातडीने सुरू करण्यासंदर्भातही चर्चा झाली. प्राणी बचाव केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांकडे लावून धरली. यासोबतच पर्यटन शुल्कवाढीचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला. ताडोबाला नियमित भेट देणाऱ्या पर्यटकांकडून ७५० रुपये पर्यटन शुल्क वसूल करण्यात येते तसेच रविवार, शनिवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. या शुल्कात वाढ करण्यात आली नसली तरी हत्तीची सफारी देशी-विदेशी पर्यटकांसाठी महागली आहे. सध्या हत्तीच्या सफारीसाठी देशी पर्यटकांकडून १०० रुपये शुल्क वसूल केले जाते तर सुट्टीच्या दिवशी १५० रुपये घेतले जातात. १ ऑक्टोबरपासून हत्तीचे शुल्क नियमित दिवशी २०० रुपये व सुटीच्या दिवशी ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यासोबतच विदेशी पर्यटकांकडून आजवर नियमित दिवशी ६०० तर सुट्टीच्या दिवशी ९०० रुपये सफारीसाठी घेण्यात येत होते. या शुल्कात सरळ दुपटीने वाढ करण्यात आली असून नियमित दिवशी १२०० रुपये तर सुटीच्या दिवशी १८०० रुपये पर्यटन शुल्क घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केवळ हत्तीची सफारीच नाही तर कॅमेरा शुल्कातसुद्धा भरमसाट वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे. आजवर कॅमेरासाठी केवळ ५० रुपये शुल्क घेतले जाणार होते. आता २५० एम.एम.च्या कॅमेरासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यासोबतच ताडोबा प्रकल्पाच्या विकासासाठी काही धोरणात्मक निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आले. यावर्षी पर्यटनाच्या माध्यमातून ताडोबाच्या उत्पादनात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता इको टुरिझम ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पर्यटनाच्या दृष्टीने काही सकारात्मक सूचना बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी केल्या.

पावसाळ्यात पाच ते सहा गाडय़ांना परवानगी
पावसाळ्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद राहणार असला तरी पाच ते सहा गाडय़ा सोडण्याची सूचना व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली. या कालावधीत ताडोबातील मुख्य डांबरी रस्ता सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पाच ते सहा गाडय़ांना केवळ मुख्य मार्गाचीच परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण प्रकल्प पावसाळ्यात बंद राहणार आहे.

Story img Loader