भारत नेहमीच ज्ञानशक्तीच्या केंद्रस्थानी राहिला. सुश्रुत, चार्वाकापासून अनेक शक्तिस्थळे देशात आहेत. काही गोष्टी लाजिरवाण्याही आहेत. थोर कवी महंमद इक्बाल यांनी ‘कुछ बात है ऐसी की हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा दुश्मन दौरे जहाँ हमारा’ या ओळींमध्ये देशाच्या विविधतेचे समर्पक वर्णन केले आहे. लेखकांनी त्याचा नव्याने शोध घ्यायला हवा. इंग्रजीमुळे अमेरिका बांधली गेली असे म्हणतात. एका लिपीमुळे चीन मजबूत आहे. विविध भाषा असलेल्या देशाच्या एकजुटीचे रहस्य आपल्या लेखकांनी शोधायला हवे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी येथे मांडले.
साहित्य अकादमीच्या वतीने हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडर येथे पूवरेत्तर व पश्चिम विभागीय लेखकांची दोन दिवसांचे संमेलन आयोजित केले असून, शनिवारी त्याचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, अकादमीचे प्रभारी सचिव डॉ. एस. के. राव, कृष्णा किंबहुणे या वेळी उपस्थित होते.
विविधता व आधुनिकता हे दोन्ही घटक एकत्र आणण्याचे भाषा हेच प्रभावी सूत्र आहे. भारतासारख्या वैविध्याने नटलेल्या देशात संस्कृती टिकून आहे. ती टिकविण्यात परंपरेचा धागा महत्त्वाचा आहे. परंपरेपेक्षा आपले शहाणपण मोठे नसते. विज्ञानाने समाज घडत नाही. वैज्ञानिक समाजनिर्मिती होत नसते, तर परंपरा ती घडवून आणत असते, असे मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी आपण मणिपुरी, खान्देशी, आसामी असेच काही तरी होतो. नंतर आपण भारतीय झालो. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीचे लेखक कवी महंमद इक्बाल, सदत हसन मंटो, सानेगुरुजी यांना जोडणारा धागा भाषा होती. दक्षिण आशियाई अशी आपली खरी ओळख आहे. परंतु आपल्याकडे त्याचा उल्लेख चुकीने ‘भारतीय’ असा केला जातो. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, की ३३ अभिजात भाषा पूवरेत्तर व पश्चिम भागात बोलल्या जातात. एवढी विविधता असली, तरी आपल्या संवादाला खीळ बसली नाही. महादजी शिंदे यांच्यासारखा शिलेदार काबूलमध्ये त्याचा कारभार चालवत असे, तेव्हा त्याचा संवाद कोणत्या भाषेत असेल? संवादाची समस्या इंग्रजांनंतर आली. आता आपण इंग्रजीचे गुलाम आहोत, हे देखील मान्य करायला हवे.
समृद्ध ज्ञानसंपदेमध्ये भारताने नेहमीच वरचे स्थान राखले. देशात वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा असल्या, तरी या विविधतेला एकत्र सांधण्याचे, एकात्मतेचे समान सूत्र साहित्यात आहे. हे लक्षात घेऊन लेखकांनी लिहिते राहायला हवे. संस्कृतीची आदर्श मूल्ये हरवल्यानेच आज भाषावाद, प्रांतवादासारखे प्रश्न तयार झाले आहेत. अर्धे भारतीय व अर्धे युरोपियन हा प्रकारही गंभीर प्रश्नांना खतपाणी घालतो आहे. तो राष्ट्रीयत्वाला घातक ठरत आहे. विविधतेमध्ये अनेक विचार, भाषा, परंपरा वगैरे सर्व असले, तरी या सर्वाना एकत्र सांधणारे येथे असे काही घटक आहेत की ज्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटायला हवे. त्यामुळेच विविधता आणि आधुनिकता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरतात. उच्च वारसा जपण्यासाठी परंपरेमध्ये पुरेशी क्षमता आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पानतावणे यांनी, ललित साहित्यच केवळ नव्हे तर वैचारिक साहित्यही वेगवेगळ्या भाषांमध्ये गेले पाहिजे. विविध भाषांमधील साहित्याचा अनुवाद प्राधान्याने झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. गुणवत्तापूर्ण व गुणवत्ताहीन हे दोनच प्रकार साहित्यात पाहावयास मिळतात. आज दर्जाहीन, दुय्यम दर्जाचे साहित्यही उच्च मानले जाते वा तसा आभास निर्माण केला जात आहे. हे दुष्टचक्र भेदण्याची गरज आहे.
काल-परवापर्यंत साहित्यापासून दूर राहणारेही आता मात्र साहित्य न वाचताच साहित्याविषयी पोटतिडकीने बोलू लागले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
साहित्यामध्ये नवे प्रवाह येत असून नव्या प्रयोगांमुळे भाषाही समृद्ध होत आहे. नव्या जीवनशैलीत नवी आव्हाने निर्माण होत असली, तरी लेखकमंडळी मात्र प्रादेशिकता वादातच अडकून राहत आहेत.
गुलामगिरी, तसेच शोषणाविरुद्ध लढणारे अनेक समूह समाजात आहेत. यात साहित्य मोठी भूमिका बजावू शकते. हा संवाद अधिक मजबूत व्हावा, या साठी अनुवाद संस्कृतीवर भर देण्याची गरज डॉ. पानतावणे यांनी मांडली.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात साहित्य अकादमीने सन्मानित केलेल्या डॉ. संतोष भूमकर, डॉ. यशवंत मनोहर, यज्ञेश दवे, जीवन नामडुंग, ढोलन राही यांनी आपली साहित्यकृती सादर केली.
ऐसे व्हावे संमेलन!
भोजनभाऊंची गर्दी नाही. सत्कार-सन्मानाची दाटी नाही. कोणी कोणत्या खुर्चीवर बसावे, याचा बडेजाव नाही. पुष्पगुच्छ-हारतुरे नाहीत की ‘मी श्रेष्ठ बाकी कनिष्ठ’ अशा उतरंडीने मांडलेली आसनव्यवस्था नाही तरीही साहित्यावर संवेदनशील चर्चा असा माहोल औरंगाबादेत साहित्य अकादमीतर्फे आयोजित लेखकांच्या संमेलनात होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा