लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयानिमित्त चार दिवस व्यापार बंद आंदोलन स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केले असून गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठासह शहराच्या विविध भागातील किरकोळ दुकाने कमी-अधिक प्रमाणात बंद होती. व्यापार बंदला शहरात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी विरोधी संघर्ष समितीने व्हेरायटी चौकातून शांतीमार्च काढून निषेध केला.
चार दिवस शहरातील विविध बाजारपेठमधील वर्दळ आणि धावपळ आज शांत झाली होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी आणि गांधीबागमध्ये शुकशुकाट होता. इतवारीमधील उपोषण मंडपात व्यापारी दिसू लागले. मुंबईमध्ये व्यापारांनी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी नागपुरात मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. नाग विदर्भ ऑफ चेंबर कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून त्यात सत्याग्रह आणि उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध भागातून रोज शांचीमार्च आणि धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतवारीमधील धान्य बाजार, किराणा बाजार, सराफा ओळमधील दुकाने बंद होती. तर महाल, सक्करदरा, सीताबर्डी मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, सदर, गोकुळपेठ, खामला, सदर या भागातील दुकाने कमी-अधिक प्रमाणात सुरू होती. चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध बाजारपेठामध्ये फेरफटका मारून आढावा घेतला. चार दिवस मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे अनेक व्यापारांकडील माल संपलेला होता. एक एप्रिलपासून आयात बंद करण्यात आल्याने ठोक विक्रेत्यांकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला त्यामुळे येणाऱ्या दिवसात ग्राहकांसमोर मोठी समस्या निर्माण होणार आहे. चिल्लर विक्रेत्यांकडे असलेला माल संपल्यानंतर जादा भावाने ग्राहकांना माल घ्यावा लागणार आहे.
या संदर्भात एलबीटी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री यांनी सांगितले, व्यापारी नाही तर राज्य सरकारच ग्राहकांना आणि व्यापारांना वेठीस धरीत असून मुख्यमंत्री एलबीटीवर कुठलाच सकारात्मक निर्णय घेत नाही. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चार दिवस बाजारपेठ सुरू ठेवण्यात आल्या मात्र जो पर्यंत एलबीटी रद्द होत तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. येणाऱ्या दिवसात शहरातील विविध भागात सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून व्हेरायटी चौकातून शांतीमार्च काढण्यात आला. येणाऱ्या दिवसात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असून पोलिसांनी जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी दिला. व्यापारी संघटना आणि राज्यातील खासदारांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एलबीटीवर तोडगा काढण्यासंबंधी निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री ऐकत नाहीत. मुख्यमंत्री हे सोनिया गांधींपेक्षा मोठे आहे का, असा प्रश्न रमेश मंत्री यांनी केला.
‘बंद’ची पुन्हा होरपळ; व्यापाऱ्यांचा शांतीमार्च
लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयानिमित्त चार दिवस व्यापार बंद आंदोलन स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केले असून गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठासह शहराच्या विविध भागातील किरकोळ दुकाने कमी-अधिक प्रमाणात बंद होती.
First published on: 17-05-2013 at 03:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traders again started strike scilent rally