शहराचे विस्तारीकरण समोर ठेवून दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने मध्यवस्तीत भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करून दिली. तेथे छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांसाठी ओटे बांधले आहेत. परंतु व्यापारी तेथे जाण्यास तयार नाहीत. नगरपालिकाही या बाबत ठोस भूमिका घेत नाही. परिणामी या जागेला सध्या उकिरडय़ाचे स्वरूप आले आहे.
नगरपालिकेने छोटय़ा व्यावसायिकांना सर्व सोयींयुक्त भाजी मंडई शहराच्या मध्यवस्तीत सिद्धिविनायक संकुल परिसरात उपलब्ध करून दिली. प्रशस्त २८ मोठे ओटे बांधण्यात आले. प्रत्येक ओटय़ावर स्वतंत्र पत्र्याचे शेड टाकण्यात आले. स्वच्छतागृहाचे बांधकामही करण्यात आले. भाजी मंडईच्या आतील भागात वाहने येऊ नयेत, या साठी लोखंडी गेटही बसविले आहे. पाण्यासाठी सिमेंटची टाकी बांधण्यात आली. परंतु सर्व सोयींयुक्त असलेल्या भाजी मंडईत येण्यास व्यावसायिकांनी मात्र स्पष्ट नकार दिला.
नियोजित जागा अपुरी आहे. येथे बाजारपेठेची घडी बसवणे शक्य होणार नाही, असे कारण व्यावसायिकांनी पुढे केले आहे. सध्या ज्या ठिकाणी भाजी मंडई आहे, ती जागा मोठी व बाजारपेठेसाठी व्यावसायिकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नियोजित भाजी मंडईत जाण्यास नकार दिला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी व्यावसायिकांना नियोजित भाजी मंडईत स्थलांतरीत होण्याची विनंती केली होती. एवढेच नव्हे, तर नगरपालिकेनेही व्यावसायिकांना नोटीस बजावून स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही स्थलांतराचे भिजत घोंगडे कायम आहे. एकीकडे व्यापारी व नगरपालिका यांच्यात स्थलांतरावरून वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्व सोयींनी युक्त नियोजित भाजी मंडई परिसराला उकिरडय़ाचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणचा कचरा या मंडई परिसरात आणून टाकला जात आहे. मोकळय़ा जागेचा लघुशंकेसाठी वापर केला जात आहे. परिसरात असलेल्या हॉटेलमधील केरकचरा याच ठिकाणी टाकण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या मोकळय़ा जागेचा अशा प्रकारे वापर होत असल्याने नगरपालिकेने यावर खर्च केलेले लाखो रुपये कचऱ्यातच जाण्याच्या मार्गावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा