‘प्रथम पेहला समरिये स्वामी तमने सुनहरा, रिद्धी-सिद्धी ना दातार देवता..’ या गणेशवंदनेबरोबरच ढोल घुमू लागतो आणि गरब्या भोवती ताल धरत अबालवृद्ध महिला-पुरुषांचे पाय थिरकू लागतात. अन् मुंबईत दर्शन घडते ते सौराष्ट्रामधील खारवा समाजाच्या संस्कृतीचे. नवरात्रौत्सवात रात्र जागविताना डिस्को दांडिया आणि आता डीजेने घुसखोरी केली. मात्र आजही आपल्या गरब्याचा सांस्कृतिक ठेवा या समाजाने जपला आहे.
सुमारे १०० वर्षांपूर्वी गुजरातमधील सौराष्ट्रातील मांगरोळ गावातून खारवा समाजातील काही तरुण कामधंद्याच्या शोधात मुंबईत आणि हळूहळू ते पक्के मुंबईकर झाले. काहींनी चिराबाजरातील चंदनवाडीमधील बीआयटी चाळीत आश्रय घेतला. मच्छिमारीचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणांनी मिळेल ते काम करीत आपला संसाराचा गाडा रेटला. त्यांची आजची पिढी शिक्षण घेऊन निरनिराळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय करीत आहेत. खारवा समाजात दुर्गा मातेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सुमारे ५४ वर्षांपूर्वी नवदुर्गा मित्र मंडळ श्री मुंबई खारवा समाज या संस्थेची स्थापना झाली आणि तेव्हापासून चंदनवाडीत नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली.
गेल्या दोन-तीन दशकांमध्ये नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मुंबईत गुजराती गरब्याचे दर्शन घडत होते. परंतु कालौघात गरब्याची जागा दांडियाने घेतली. त्यानंतर डिस्को दांडिया आणि आता डीजेने घुसखोरी केली. त्यामुळे मूळ गरबा हरवून गेला. मात्र या मंडळाने डिस्को दांडिया आणि डीजेची घुसखोरी होऊ दिलेली नाही. आजही येथे पारंपारिक गरब्यावरच महिला आणि पुरुषांचे पाय थिरकताना दिसतात. समाजातील ढोल घुमविणारे वादक आणि आपल्या भारदस्त आवाजात गीते सादर करणारे गायक यांच्या तालावरच चंदनवाडीत गरब्याने आजही नवरात्रौत्सवात रात्र जागविली जाते. सौराष्ट्रातील गायक आणि वादक त्यासाठी खास दरवर्षी आवर्जून चंदनवाडीत येतात हे विशेष. या समाजात विविध वाहनांवर आरुढ असलेल्या दुर्गा मातेची घरोघरी पूजा केली जाते. त्यामुळे चंदनवाडीत कधी उंटावर, कधी शेळीवर, कधी कोंबडय़ावर, तर कधी सिंव्हावर आरुढ झालेल्या दुर्गामाताचे येथे दर्शन घडते.
बीआयटी चाळीच्या बाहेरील कोणाकडूनही वर्गणी घ्यायची नाही, असा या मंडळाचा दंडक आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरील पुरुषांनाही गरब्यात प्रवेश निषिद्ध आहे. तसेच महिला आणि पुरुषांचा गरबाही स्वतंत्रच असतो. गरब्याला गालबोट लागू नये त्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक दक्ष असतात. काही भाविक दुर्गा मातेला चुनरी, साडी अर्पण करतात. नंतर या वस्तू मंडळाचे सदस्य अथवा इच्छुक स्वयंसेवकांना प्रसाद म्हणून दिल्या जातात.
ढोलीरा ढोल ढिमो वघाडवा.., महालक्ष्मीनी यात्रा करवीरे डहाणूना डुंगरे.., मेलेडी रमे मारी मेलेडी रमे, भुवाँ धुणे माना भुवाँ धुणे.., खम्मा खम्मा पिरने जाजी खम्मा, रामदेव मिरने जाजी खम्मा.. अशा अनेक गीतांनी रात्री गरबा घुमत जातो आणि आपल्या संस्कृतीमध्ये ही मंडळी रमून जातात.
नवरात्रौत्सव म्हटले की, मुंबईत डीजे, डिस्कोचा सुळसुळाट असतो. अशा गोंधळातच अनेक सेलिब्रिटी गायक खास नवरात्रीसाठी प्रसिद्ध आहेत. फाल्गुनी पाठक, प्रीती- पिंकी, राहुल वैद्य आदी त्यापैकीच एक. यंदाच्या मोसमातही खास सेलिब्रिटी गायक आपली कला सादर करणार आहेत.
फाल्गुनी पाठक :
घाटकोपर नवरात्री मंडळ २०१३, पोलिस परेड मदान
पासेस – ६०० रुपये (शनिवार-रविवार)
४०० रुपये प्रतिदिन
नऊ दिवसांचा पास – साडेतीन हजार रुपये.
घुम्यो रे..
‘प्रथम पेहला समरिये स्वामी तमने सुनहरा, रिद्धी-सिद्धी ना दातार देवता..’ या गणेशवंदनेबरोबरच ढोल घुमू लागतो आणि गरब्या भोवती ताल धरत अबालवृद्ध महिला-पुरुषांचे पाय थिरकू लागतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-10-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional garba