नवरात्रीतील नऊ दिवस म्हणजे नुसता धिंगाणा, असे म्हणत नाके मुरडणाऱ्यांनी एकदा घाटकोपरच्या भानुशाली वाडीला भेट द्यायला हवी. गेली ५३ वर्षे घाटकोपर पूर्वेला असलेल्या या वाडीत अगदी पारंपरिक पद्धतीने दर दिवशी घटाची पूजा होते, लाकडाच्या गरवीमध्ये गरबा बसवला जातो आणि त्याभोवती ताल धरून पारंपरिक गरब्याच्या गाण्यांच्या साथीने तो गरबा घुमवलाही जातो. मुंबईत सध्या ‘दांडिया नाइट विथ..’ एखादा सेलिब्रिटी ही संस्कृती फोफावत असताना दुसऱ्या बाजूला वाडीतील तरुणांनाही बरोबर घेत भानुशाली समाजाने हा पारंपरिक वसा जपला आहे.
भानुशाली वाडीत १९६०च्या सुमारास हिंगलाज मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. ही हिंगलाज माता म्हणजे कच्छमधील भानुशाली समाजाची देवी! या हिंगलाज मातेचे एक पुरातन मंदिर चौल येथे हिंगुळजा माता म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या स्थापनेबरोबरच भानुशाली समाजाने नवरात्र आणि गरब्याची सुरुवात केली. या गरब्यातही आमच्या पूर्वजांनी एक शिस्त आखून दिली आहे. ती शिस्त आम्ही दरवर्षी अजूनही नेटाने पाळतो, असे भानुशाली वाडीतील मंगल भानुशाली यांनी सांगितले.
पारंपरिक गरब्याचे नियम
पारंपरिक गरबा हा टाळ्या आणि टिपऱ्या या दोन्हीच्या साथीने खेळला जातो. या गरब्याचे काही नियम असतात. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गरबा खेळताना पादत्राणे घालायची नसतात. दुसरा नियम म्हणजे पुरुष आणि स्त्रिया हा गरबा एकत्र खेळत नाहीत. आणि आणखी एक खूपच महत्त्वाचा आणि ज्याच्यामुळे ही शेकडो वर्षांची परंपरा काटेकोरपणे जपली गेली आहे, असा नियम म्हणजे या गरब्यात फक्त गरब्यासाठीच्या पारंपरिक गाण्यांवरच ताल धरला जातो. उगाचच एखाद्या फिल्मी गाण्याला गरब्याच्या ठेक्यात बसवून त्यावर नाचण्याचा अट्टहास केला जात नाही.
पारंपरिक गरबा असतो कसा?
भानुशाली समाजाचे काही रीतिरिवाज आहेत. गरबा खेळण्याआधी दर दिवशी घटाची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा दीड ते दोन तास रोज चालते. त्यानंतर लाकडाच्या गरवीतील पात्रात कापसाच्या बिया टाकून अग्नी प्रज्वलित केला जातो. गरवी म्हणजे मंदिराच्या आकाराची लाकडाची प्रतिकृती. या अग्नीला ज्योत म्हणतात. आणि या सगळ्या प्रकाराला गरबा म्हणतात. ही पूजा झाल्यानंतर मग सर्वप्रथम धिम्या लयीत गरब्याची सुरुवात होते. गरब्यासाठीच्या गाण्यांचा क्रमही ठरलेला आहे. त्या क्रमात आणि त्या लयीतच ही गाणी म्हटली जातात. गरब्याची सुरुवात होते ती, ‘माँ, पावाते गडपी उतऱ्यां मा काडी रे..’ या गाण्याने. या गाण्याचा अर्थ असा की, ‘हे आई, तू पावागडावरून उतरून खाली ये..’. थोडक्यात, ‘एकवीरा आई, तू डोंगरावरी’ याचीच ही गुजराती आवृत्ती!
गरबा खेळण्याचेही प्रकार असतात. सर्वात प्रथम हिंच या प्रकाराने तो खेळला जातो. हिंच म्हणजे हळूहळू. त्यानंतर मग ‘तीनताडी’, ‘पाचताडी’ (तीन टाळी, पाच टाळी?) अशी ही लय वाढत जाते आणि शेवटी द्रुत लयीतील ‘धमाल’ या प्रकाराने गरब्याचा शेवट होतो. पूर्वीच्या काळी रात्र रात्र गरबा रंगायचा. पण आता मात्र आवाजावरील बंधनांमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गरबा लवकर आटोपता घ्यावा लागतो. या वाडीतील गरब्याचा आणखी एक नियम म्हणजे हा गरबा फक्त भानुशाली समाजातील लोकांनाच खेळता येतो. गरबा पाहायला, देवीचे दर्शन घ्यायला कोणीही येऊ शकते. मात्र गरबा खेळण्याचा अधिकार फक्त भानुशाली समाजातील लोकांनाच आहे. हा गरबा घाटकोपरबरोबरच कल्याणपासून वसईपर्यंत पसरलेल्या भानुशाली समाजात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे मुंबईच्या कानाकोपऱ्यांतून लोक गरबा खेळायला येतात.
तरुणाई आणि परंपरा
टेपरेकॉर्डर आणि डीजेचा जमाना वाढला, तसे या गरब्यासमोरही हे आव्हान उभे राहिले होते. वाडीतल्या काही तरुणांनी डीजेच्या तालावर गरब्याचा फेर धरण्याचा हट्टही धरला होता. मात्र आम्ही जाणत्या माणसांनी एकत्र येत, त्यावर चर्चा घडवून आणली. त्यानंतर हा हट्ट फेटाळण्यात आल्याचे मंगल भानुशाली यांनी सांगितले. विशेष म्हणजे आता मात्र तरुणांची मागणी लक्षात घेऊन त्यांना या परंपरेशी जोडून ठेवण्यासाठी नऊ दिवसांपैकी एका दिवशी ऑर्केस्ट्राबरोबर नाचायची संधी तरुणांना देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठीही वाडीतल्या आणि समाजातल्या तरुणांचेच ऑर्केस्ट्रा पथक तयार करण्यात येणार आहे.
पाटीदार समाजाची गरबी
घाटकोपरलाच पश्चिमेला लाल बहादूर शास्त्री मार्गावर गेली ७५ वर्षे पाटीदार समाजाची गरबीही प्रसिद्ध आहे. या गरबीची परंपरा आणि त्याच्या चालीरीतीही भानुशाली समाजाप्रमाणेच आहेत. ही गरबी लाल बहादूर शास्त्री मार्गावरील माणिकलाल बंगला या मोठय़ा बंगल्याच्या आवारात होते.
आधुनिक प्रदूषणापासून मुक्त भानुशाली वाडीतील पारंपरिक गरबा
नवरात्रीतील नऊ दिवस म्हणजे नुसता धिंगाणा, असे म्हणत नाके मुरडणाऱ्यांनी एकदा घाटकोपरच्या भानुशाली वाडीला भेट द्यायला हवी.
आणखी वाचा
First published on: 08-10-2013 at 06:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional garba in bhanushali wadi