जिल्हा सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सव २२ मार्चपासून चांदा क्लबच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक हरिहरन असतील.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. २३ मार्चला जागतिक कीर्तीच्या नृत्यांगना पार्वती दत्ता यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार असून २४ मार्चला प्रसिद्ध सुफी गायक भारती बंधू यांच्या सुफी गायनाने महोत्सवाची सांगता होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या महोत्सवादरम्यान जिल्ह्य़ातील स्थानिक कलावंतांना, तसेच पारंपरिक नृत्य कलावंतांना संधी देण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी आवर्जून सांगितले. प्रेक्षकांसाठी हा महोत्सव नि:शुल्क राहणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त प्रेक्षक येणे अपेक्षित असल्यास आसन व्यवस्था वाढवण्याचे प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या सांस्कृतिक महोत्सवाला शासनाकडून ५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या महोत्सवात नागरिकांना वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेता येणार आहे. पंचशताब्दी वर्षांनिमित्त वष्रेभर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून वाघमारे म्हणाले की, तालुकास्तरावर हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देणे, हा यामागचा उद्देश आहे. २२ व २३ मार्चला गं्रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ विक्रीस उपलब्ध राहणार आहे. लोकांसाठी वाचन संस्कृतीशी संबंधित विषयावर परिसंवाद आयोजितही करण्यत येणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गीते यांनी दिली, तर या महोत्सावासाठी शासनाच्या वतीने १५ ते २० लाखांचा खर्च होण्याची शक्यता आहे.
या महोत्सवात नामांकित कलावंतांना ऐकण्याची व पाहण्याची संधी, तसेच ग्रंथोत्सवात दुर्मिळ ग्रंथ व नामवंत साहित्यिकांचे साहित्य खरेदी करण्याची संधी चंद्रपूरकरांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader