समृद्धभारतीय पारंपरिक चित्रकलेचे पिढय़ांपिढय़ा वहन व संवर्धन करणाऱ्यांकडूनच ती कला प्रत्यक्ष शिकण्यास उत्सुक असलेल्या नागपुरातील चित्रप्रेमींनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आवार सध्या फुलून गेले आहे. प्रथमच ब्रश हातात धरणाऱ्यांपासून ते चित्रकलेचे विभिन्न पदर उलगडू बघणाऱ्यांपर्यंत अनेक कलासक्त मने सध्या पारंपरिक चित्रकलेचे बारकावे जाणून घेण्यात मग्न आहेत.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने केंद्राच्या मुक्तांगण परिसरात पारंपरिक भारतीय लोककला व आदिवासी चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ५ ते १४ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. देशभरातील २० नामवंत चित्रकारांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले असून ते २० विविध चित्रकला शैलींचे प्रशिक्षण देत आहेत.
वारली, गोंड, सांजा, मांडवा, कलमकारी, नाथद्वार, सोरा, मधुबनी, पट फड पॉम लिफ तसेच आंध्रप्रदेश, केरळ, मैसूर येथील चित्रकला शैलींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेला नागपूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून वेगवेगळ्या कलाप्रकारात सुमारे ३०० कलाप्रेमी सहभागी झाले आहेत. दुपारच्या वेळेत केंद्राच्या निसर्गरम्य परिसरात विभिन्न वयोगटातील इच्छुक चित्रकार आपापले साहित्य घेऊन जमत आहेत आणि २ ते ३ तास बसून चित्रकलेचे धडे गिरवत आहेत. बाल-तरूण चित्रकार या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. मात्र, महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. कॅनव्हासवर किंवा कापडावर, कुणी वारली तर कुणी मधुबनी चित्रप्रकार शिकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपले वय विसरून, कुठल्यातरी झाडाखाली बसून व आपले पेन्सिल-कुंचले सावरून उत्साही चित्रकार चित्र काढण्यात गुंगलेले आहेत, असे मोठे विलोभनीय चित्र सध्या केंद्राच्या परिसरात अनुभवायला मिळत आहे.
वेगवेगळया प्रांतात राहणाऱ्या, परंपरेने कलेची उपासना करणाऱ्या व चित्रकला हा ज्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे, अशांकडून  चित्रकला शिकण्याची संधी नागपूरकरांना या कार्यशाळेच्या निमित्ताने मिळाली आहे. कुठलाही कलाप्रकार हा अल्पावधीत शिकता येणे शक्यच नाही. समृद्ध भारतीय चित्रकलेशी, तिच्याशी निगडित इतिहास व परंपरांशी व त्या एकंदर जीवनप्रवाहाशी ओळख करून घेण्याची संधी कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मिळत आहे.
‘मधुबनी’ कलाप्रकाराचा संबंध मैथिली भाषेशी आहे. या भाषेतून आमच्यापर्यंत पोहोचलेले पौराणिक प्रसंग चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आठ दिवसात मधुबनीचे प्राथमिक धडे आम्ही सहभागींना देणार आहोत, त्यानंतर ज्याची जशी प्रतिभा तसा तो स्वत:ला या कलेत विकसित करू शकतो,’ असे बिहारमधून आलेल्या मधुबनी कलाकार मधु झा यांनी सांगितले.
मधु स्वत: व त्यांची कन्या कार्यशाळेत मधुबनीचे धडे देण्याकरिता आल्या आहेत. त्यांच्या आई-आजीकडून ही कला त्यांच्यापर्यंत आली असून त्यांच्या गावात मधुबनीची उपासना करणारी अनेक कुटुंबे आहेत.
कामाचा ताण विसरण्यासाठी, काहीतरी वेगळे करू बघण्यासाठी महाविद्यालयातील काम आटोपल्यावर पोहोचणाऱ्या प्रा. देवयानी शिरखेडकर असोत, नावीन्याची कास धरलेला तरूण चित्रकार नवीन मुळे असो की वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ‘वारली’ शिकू  इच्छिणारे डॉ. उमरेडकर असोत.
या सगळया उत्साहाने बहरलेल्या कलासक्तांसाठी ही कार्यशाळा आनंदाचा ठेवा ठरली आहे.

Story img Loader