कल्याण-डोंबिवली शहरात अतिशय संथ गतीने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असून त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यात वाहतूक कोंडीची शक्यता असलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने बराच काळ वाहनांना एकाच ठिकाणी खोळंबून राहावे लागत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.  
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, काटेमानिवली, डोंबिवलीतील राजाजी रस्ता, मानपाडा, पाथर्ली कल्याण रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाची डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेली ही कामे १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, ही कामे ठेकेदार, पालिका प्रकल्प अभियंत्यांची निष्क्रियता, प्रकल्प अभियंत्यांच्या नेमणुकांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलामुळे रखडली असल्याची टीका होत आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केल्यानंतर या कामाची मजबुती योग्य आहे की नाही याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. संथगती कामांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त करून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयी अधिकाऱ्यांना फर्मावले.
 टिटवाळ्यात निकृष्ट कामे
टिटवाळ्यात माताजी मंदिर ते रेल्वे स्थानक भागात पालिकेतर्फे सुरू असलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर या कामासाठी प्रस्तावित केलेले साडेपाच कोटी रुपये पाण्यात जातील, अशी तक्रार या भागातील नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी प्रशासनाकडे केली आहे. माताजी ते रेल्वे स्थानक या दोन किमी लांबीच्या तीस मीटर रुंदीच्या रस्ते, गटारांच्या कामात सिमेंट, वाळू यांचे कोणतेही प्रमाण न ठेवता कामे करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी माती, डबर दगडाचा वापर केला जात आहे. हे काम योग्य पद्धतीने झाले नाही तर हा रस्ता लवकर खचेल, अशी भीती नगरसेवक सरनोबत यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा