मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीची खडान्खडा माहिती यापुढे मोबाइलच्या एका क्लिकवर मिळणार आहे. ठाणे पोलिसांनी विकसित केलेल्या एका तंत्रज्ञानानुसार मोबाइलच्या अॅप्सवर (ट्राफ्फलाइन) मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यातील वाहतुकीची स्थिती कळू शकणार आहे. वाहतूक कोंडीने बेजार होण्यापेक्षा या अॅप्सवर जाऊन रस्त्यावरील वाहतुकीची स्थिती तपासून घ्या, मगच आपला मार्ग ठरवा, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी केले आहे. तसेच वाहन चालवीत असताना चालकाने अॅप्सचा वापर करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळाचे तसेच ‘ट्राफ्फलाइन’(traffline) या मोबाइल अॅप्सचे गुरुवारी आयुक्त रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी सहपोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग उपस्थित होते.
ठाणे शहरातील दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीची माहिती नागरिकांना मिळावी, या उद्देशातून ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी मोबाइल अॅप्सवर ‘ट्राफ्फलाइन’ नावाचे तंत्रज्ञान विकसित करून घेतले आहे. त्यामध्ये ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची इत्थंभूत माहिती नकाशासहित देण्यात आली आहे. ठाणे शहरातील बहुतेक नागरिक कामानिमित्त मुंबई तसेच नवी मुंबई शहरात दररोज जात असतात. त्यामुळे या अॅप्सवर मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे ग्रामीण परिसरातील रस्त्यांची नकाशासहित माहिती देण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर आणि ग्रामीण परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीची स्थिती कळू शकणार आहे, अॅन्ड्राइड, आयफोन तसेच ब्लॅकबेरी, आदी मोबाइलवर ‘ट्राफ्फलाइन’ अॅप्स डाऊनलोड करता येऊ शकते, अशी माहिती डॉ. परोपकारी यांनी दिली. वाहतुकीसंबंधीची आगाऊ माहिती या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
रंग दर्शविणार वाहतुकीची स्थिती..
मोबाइलच्या अॅप्सवरील ‘ट्राफ्फलाइन’वर शहरातील रस्त्यांची इत्थंभूत माहिती नकाशासहित देण्यात आली असून त्या रस्त्यांवरील वाहतूक स्थिती हिरवा, निळा, गुलाबी आणि लाल अशा चार रंगांनी दर्शविण्यात आली आहे. हिरवा- सुरळीत, निळा- संथगतीने, गुलाबी- अति संथगतीने, लाल- ठप्प, असे या रंगांचे संकेत आहेत. या अॅप्सवर वाहतुकीसंबंधीचे अलर्टही पाहता येणार आहेत. तसेच नागरिकांनाही या अॅप्सवर माहिती नोंदविता येऊ शकते, असेही डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा