मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, तसेच गडचिरोली जिल्ह्य़ात गुरुवारच्या सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्य़ातील अनेक नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सात मार्गांवरील वाहतूक आज दुपारपासून ठप्प झालेली आहे.
चार दिवसांपूर्वी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे ३ मीटरने उघडण्यात आल्याने वैगगंगेच्या उपनद्यांना पूर येऊन गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-आरमोरी, अहेरी-चंद्रपूर हे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर कालपासून हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले होते. परंतु, काल सायंकाळपासून जिल्ह्य़ात सुरू असलेला दमदार पाऊस, तसेच गोसीखुर्द धरणाचे दरवाचे १ मीटरने सुरू असल्याने जिल्ह्य़ात पुन्हा पूर परिस्थिती उद्भवली आहे. गडचिरोलीजवळील कठाणी नदीच्या पुलावर पाणी चढल्याने गडचिरोली ते आरमोरी मार्ग आज सकाळपासूनच बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गाने नागपूर, वडसा, गोंदियाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरील पोटफोडी आणि गोविंदपूर नाल्याला पूर आल्याने हा मार्गही दुपारी ११ वाजल्यानंतर बंद झाला. त्यामुळे गडचिरोलीवरून अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागडकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. सती नदीच्या पुरामुळे वैरागड-कढोली-मानापूर मार्गही बंद आहे. आष्टीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अहेरी ते चंद्रपूर हा मार्गही आज दुपारनंतर बंद झाला आहे. याशिवाय, नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे एटापल्ली-सुरजागड, सिरोंचा तालुक्यातील रोमनपल्ली-झिंगानूर, बेजूरपल्ली-परसेवाडा हे मार्गही बंद झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
पुरामुळे नदी काठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीची आकडेवारी निरंक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्य़ात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ६५.९ मि.मी.च्या सरासरीने ७९१.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक १३७ मि.मी., त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात १३२.८, धानोरा १२२, आरमोरी १२१, गडचिरोली ६६.२, एटापल्ली ३९.३, भामरागड ३९.२, देसाईगंज ६०.२, अहेरी ३२.२, चामोर्शी १५, मुलचेरा १४ आणि कोरची तालुक्यात १२.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Story img Loader