ऊसदराचे आंदोलन उग्र करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी कराडमध्ये जाहीर केल्यानंतर येथून कराड, पुणे, मुंबईकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सायंकाळपासून ठप्प झाली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर येथे रेणुका-पंचगंगा साखर कारखान्याचे शेती कार्यालय पेटवून देण्याबरोबर दोन ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेकीचा प्रकार घडला. उद्या गुरुवारपासून आंदोलनाचे लोण आणखी वाढण्याची शक्यता जाणवत आहे.    
ऊसदराचे केंद्र कराड हे बनले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते कालपासून कराडकडे रवाना झाले आहेत. जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुक्कामही कराड येथेच आहे. संघटनेतील प्रमुख जिल्ह्य़ात नसल्याने आंदोलनाची म्हणावी तितकी धग अद्याप जिल्ह्य़ामध्ये जाणवत नाही. बुधवारी खासदार शेट्टी यांनी आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची घोषणा कराडमध्ये केली. कराड जवळ वाहनांची मोडतोड, जाळपोळ, दगडफेक असे प्रकार वाढीस लागले.    
राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या या घटनांची नोंद घेऊन राज्य परिवहन महामंडळाने कराडकडे जाणारी वाहतूक रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर बसस्थानकातून कराड, तासगाव, इस्लामपूर यामार्गे जाणाऱ्या गाडय़ा सायंकाळपासूनच बंद केल्या. परिणामी सदर गावांसह पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गोची झाली. सीमाभागातील गावांकडे जाणारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवाही विस्कळीत झाली. काल रात्री आंदोलन तापल्याचे वृत्त येऊ लागताच कर्नाटक परिवहन महामंडळाने महाराष्ट्रात गेलेल्या त्यांच्या सर्व गाडय़ा तातडीने कर्नाटकातील वेगवेगळ्या आगारांमध्ये परत बोलावून घेतल्या होत्या.    
जयसिंगपूर येथील रेणुका-पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यालयाचा दरवाजा तोडण्यात येऊन तो पेटवून देण्यात आला. घटनास्थळी अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आली. निमशिरगाव रस्त्यावर आंदोलकांनी टायर्स पेटवून वाहतूक रोखून धरली होती. जयसिंगपूर जवळ दोन ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्याचा प्रकारही घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा