विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा-ऑटोरिक्षा आणि स्कूल बसेससाठी वाहनतळांची व्यवस्था नसल्यामुळे शहरातील विविध भागातील शाळा व महाविद्यालयांसमोर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रशासन व शाळा-महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाही तोडगा काढलेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात पालक मुलाला चांगल्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करीत असतात. घरापासून शाळा-महाविद्यालयाचे अंतर याचा विचार केला जात नसल्यामुळे पालक त्यांना सायकल किंवा दुचाकी वाहन घेऊन देतात. तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेमध्ये असलेल्या मुलाजवळ सायकल आणि नवव्या किंवा दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांजवळ दुचाकी वाहन दिसून येत आहे. त्यामुळे बहुतेक शाळा-महाविद्यालयामध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, त्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांमध्ये वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वाहने बाहेर ठेवावी लागतात. गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांची वाहने चोरीला जाण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात उघडकीस आले आहेत.
विदर्भातील अनेक शाळा आणि महाविद्यालयाच्या स्वतंत्र बसेस आणि खासगी ऑटो शाळा महाविद्यालयासमोर थांबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील अनेक शाळांना आज मैदाने नाहीत, त्यामुळे विद्याथ्यार्ंनी वाहने ठेवायची कुठे? हा मोठा प्रश्न आहे. सरकार दरवर्षी नवीन शाळांना परवानगी देत आहे. शिवाय तुकडय़ा वाढविण्यासाठी मान्यता देत आहे. अनेक शाळेत वर्ग खोल्या वाढविण्यात आल्या पण शाळांनी विद्यार्थ्यांना वाहने ठेवण्यासाठी सोय केली नाही. शाळेसमोर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडण्यासाठी आणि प्रवेश करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातून अनेकदा अपघात झाले आहेत. शाळेजवळ असलेल्या फुटपाथचा उपयोग वाहने ठेवण्यासाठी केला जात आहे. काही शाळेसमोर फुटपाथवर छोटय़ा विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. साधारणत एका शाळेमध्ये दीड ते दोन हजार विद्यार्थी असतात. त्यातील ६० टक्के विद्यार्थी हे स्वतच्या वाहनाने येत असतात तर ३० टक्के विद्यार्थी ऑटो आणि स्कूलबसने ये जा करीत असतात. शिवाय शाळेतील शिक्षकांची वाहने असतात. नव्या शाळांना मान्यता देताना शाळेसमोर वाहनतळ आणि मैदानासाठी मोकळी जागा किती याचा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
शाळा व्यवस्थापनाने वाहनतळांची व्यवस्था करावी
विद्यार्थ्यांच्या वाहनासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने वाहनतळांची व्यवस्था करण्याची गरज आहे. अनेक शाळांमध्ये अशी व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहने बाहेर ठेवली जातात अशा शाळांची लवकरच तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर यांनी सांगितले.
बाब निदर्शनास आणली होती
शाळांच्या वाहनतळ आणि वाहतुकीची समस्या गेल्या वर्षी होती, त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. शाळेच्या वाहनतळांसंबंधी व्यवस्था शाळा व्यवस्थानाने करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेसमोर वाहतूक पोलीस ठेवणे शक्य नाही. यावेळी पुन्हा नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे शाळेसमोर असलेल्या ऑटोचालक, बसचालकांना सूचना दिल्या जात असल्याचे पूर्व विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश बद्रे यांनी सांगितले.
शाळा व महाविद्यालयांसमोर वाहतुकीची कोंडी
विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा-ऑटोरिक्षा आणि स्कूल बसेससाठी वाहनतळांची व्यवस्था नसल्यामुळे शहरातील
First published on: 25-07-2013 at 09:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jams in front of schools colleges