महामार्गावर व्दारका चौक येथे होणारी वाहतूक कोंडी ही नाशिककरांसाठी नेहमीची बाब झाली असून अर्धा ते पाऊण तास या वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडत असल्याने या समस्येतून लवकर मार्ग काढण्याची मागणी सेवास्तंभ कर्मचारी महासंघाच्या स्थानिक शाखेतर्फे महापालिका आयुक्त आणि वाहतूक निरीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आल्यावर व्दारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल असे सांगितले जात होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. उलट या चौकातील वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक शहरात येणाऱ्या वाहनांचा संगम व्दारका चौकात होतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होणे साहजिक आहे. त्यातच या परिसरात ठिकठिकाणी रिक्षा, टॅक्सी रस्त्यावरच उभ्या राहात असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. द्वारका सर्कल हे नाशिकचे मुख्य प्रवेशव्दार आहे. सेवास्तंभ महासंघाच्या वतीने यापूर्वी निवेदनाव्दारे महामार्गावरील चाणक्य हॉटेलजवळील चौफुलीवर होणारे अपघात लक्षात घेऊन स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनी दाद मागण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. परंतु द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर अद्याप कोणताही उपाय शोधण्यात आलेला नाही. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यावर याठिकाणी नाशिकरोडच्या बाजूने, मुबई नाक्याच्या बाजूने तसेच शालिमारच्या बाजूने सुमारे दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे सदरचा मार्ग सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना जिकरीचे प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने शहराबाहेरील व शहरातील वाहतूकदारांना वाहतूक कोंडीचा त्रास सदैव सहन करावा लागत आहे. यामुळे महानगरपालिका व वाहतूक शाखा यांची प्रतिमा मलिन होत आहे. व्दारका चौकात भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. परंतु या मार्गाचा वाहतूक कोंडी दूर होण्यास कोणताही उपयोग झालेला नाही. या मार्गाचा कोणीही वापर करत नसल्याने हा प्रयोग पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. या मार्गाचे रूपांतर वाहने जाण्यासाठी केल्यास वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणणे शक्य आहे. परंतु त्यासाठी तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा अजून कितीतरी दिवस वाहतूक कोंडीचा हा विषय पेटता राहील.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गालगतच्या सव्र्हिसरोडचे रुंदीकरण करण्यात आले. रूंदीकरण करताना नागसेननगर परिसरातील चार ते पाच रहिवाशांची घरे तोडण्यात आली. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य शासन, वाहतूक शाखा यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. परंतु तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत कुठल्याही विभागाने दखल घेतलेली नाही. या नागरिकांच्या पुनर्वसनाविषयी त्वरीत कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवून नाशिककरांना दिलासा द्यावा, अशी मागणी सेवास्तंभ कर्मचारी महासंघाच्या महापालिका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर विभागीय अध्यक्ष विक्रम रेवर, अध्यक्ष, प्रकाश अहिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सरचिटणीस महेंद्र थोरात आदींची स्वाक्षरी आहे.
व्दारका चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात
महामार्गावर व्दारका चौक येथे होणारी वाहतूक कोंडी ही नाशिककरांसाठी नेहमीची बाब झाली असून अर्धा ते पाऊण तास या वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडत असल्याने या समस्येतून लवकर मार्ग काढण्याची मागणी सेवास्तंभ कर्मचारी महासंघाच्या स्थानिक शाखेतर्फे महापालिका आयुक्त आणि वाहतूक निरीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-06-2014 at 08:01 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic mess up in nashik