ठाणे येथील कैसल मील परिसरातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून मोटारसायकवरून पळालेल्या चोरास ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई आबासाहेब तानाजी मोहिते यांनी कैसलमील ते कोपरी, असा पाठलाग करून मोठय़ा धाडसाने पकडले. रविवारी सकाळी चित्रपटात शोभावे अशा दृश्याप्रमाणे हा थरार सुरू होता. शहरात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात वाढ होत असतानाच रविवारी अशाच एका चोराला जेरबंद करताना पोलीस हवालदार मोहिते याने दाखविलेल्या धाडसाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
ठाणे येथील गोकुळनगरमधील शालीमार सोसायटीत अनुराधा वाळिंबे (६६) या राहत असून त्या रविवारी सकाळी कैसलमील परिसरात मॉर्निग वॉक करीत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या सोनसाखळी चोराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला.
ही बाब सुशील रामशेकल साव या जागरूक नागरिकाने सांगताच माजिवाडा पुलाखाली वाहतूक नियमन करीत असलेले पोलीस शिपाई आबासाहेब मोहिते हे लगेचच साव यांच्या मोटारसायकवर बसले आणि त्यांनी मुंबई-नाशिक महमार्गावरून मुंबईच्या दिशेने त्या चोराचा पाठलाग सुरू केला. तीन हात नाका-मल्हार सिनेमागृह- कोपरी सर्कल मार्गे पाठलाग करीत कोपरी येथील धोबीघाटपर्यंत पोहचले. तेथे मोटारसायकल सोडून चोर धोबीघाट परिसरातील नागरी वस्तीत शिरला. त्यामुळे मोहिते यांनीही पायी पाठलाग करत त्याला मोठय़ा धाडसाने पकडले. श्याम अशोक रेवणकर (२५, रा. कोपरी), असे चोराचे नाव असून तो सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई मोहिते यांनी श्यामला राबोडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या कामगिरीबद्दल वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी पोलीस शिपाई आबासाहेब मोहिते यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा