कल्याण शहर परिसरातून भिवंडी, ठाणे, नाशिक भागात जाण्यासाठी शहराजवळील दुर्गाडी पूल हा एकमेव मार्ग आहे. ठाण्याकडून कल्याणमध्ये येण्यासाठी हाच एकमेव उड्डाणपूल उपलब्ध आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या एकमेव पुलावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात राहणारा बहुतांशी नोकरदार वर्ग वाडा, जव्हार, भिवंडी येथे नोकरीसाठी जात असतो. या भागात अनेक कंपन्या आहेत. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी ही मंडळी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बस, रिक्षा पकडून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने निघतात. या पुलावर तसेच या भागातील चौकात वाहतुकीची नेहमी कोंडी होत असल्याने वाहने जागोजागी अडकून पडतात. वेळेत कार्यालयात पोहोचणे त्यामुळे नोकरदारांना अवघड होते. भिवंडीजवळील सरवली, कोन परिसरात एमआयडीसी आहे. येथील बहुतांशी कामगार वर्ग कल्याण, उल्हासनगर परिसरात राहणारा आहे. एमआयडीसीत मालाची ने-आण करणारी वाहने याच भागातील आहेत. कोन, सरवली भागात रस्त्यांवरच सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बाजार भरलेला असतो. त्यामुळे हा रस्ता २४ तास वाहनांनी गजबजलेला असतो. अवजड वाहनांना कोन ते शिळफाटादरम्यान दिवसा प्रवेश बंद करणे आवश्यक असताना वाहूतक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे दिवसभर या ठिकाणी अवजड वाहनांची वर्दळ असते. जुना दुर्गाडी पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नाशिक, मुंबई, ठाणे, वाडा परिसरातून नवी मुंबई, रायगड, कोकण भागात जाणारी बहुतांशी वाहने भिवंडी वळण रस्त्याने दुर्गाडी पुलावरून पुढे निघून जातात. परतीची वाहने याच पुलावरून मुंबई, नाशिक, वाडा भागाकडे निघून जातात. या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी कोणतेही नियम नसल्याने वाहतुकीची कोंडी या पुलावर पाहण्यास मिळत आहे. अनेक वेळा वाहने कोन ते शिवाजी चौकदरम्यान वाहतुकीत अडकलेली असतात.
पर्यायी मार्ग
दुर्गाडी पुलाला पर्यायी नवीन सहा पदरी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे. या पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी महापालिकेने जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केली आहे. तसेच कोन ते कांचनगाव दरम्यानचा उड्डाण पूल उभारण्यात आला तर कल्याण शहरातून जाणारी वाहने नवीन पुलावरून विको कंपनीकडून शिळफाटय़ाकडे निघून जातील. गोविंदवाडी वळण रस्ता, नवीन दुर्गाडी उड्डाण पूल व कोन – विको कंपनी (डोंबिवली एमआयडीसी) उड्डाण पूल झाला तर वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
दुर्गाडी पुलावर वाहतूक कोंडीचे ओझे
कल्याण शहर परिसरातून भिवंडी, ठाणे, नाशिक भागात जाण्यासाठी शहराजवळील दुर्गाडी पूल हा एकमेव मार्ग आहे.
First published on: 07-11-2013 at 07:17 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic problem on durgadi bridge