खारघर टोलनाक्यातून पथकराची सुटका झाली तरीही येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहण्याची चिन्हे आहेत. टोलनाक्याजवळील गतिरोधक काढून वाहनांना थांबा न घेता जाता आल्यास येथे वाहतूक कोंडी टाळता येईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु अद्याप गतिरोधक काढण्याचे काम सायन-पनवेल टोलवेज कंपनीने हाती घेतले नाही. खारघरच्या टोलनाक्यातून किती रांगा मोफतच्या हलक्या वाहनांसाठी ठेवणार व अवजड वाहनांचे पथकर किती रुपयांनी वाढणार याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही. खारघर टोलनाक्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांना नऊ मार्गिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी उजव्या बाजूकडील चार मार्गिका हलक्या वाहनांसाठी राखीव ठेवण्याचा विचार टोल वसूल करणाऱ्या कंपनीचा सुरू आहे. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनीही याचप्रकारे नियोजन केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल, असे एसपीटीपीएल कंपनीला सुचवले आहे. उर्वरित पाच रांगांमधून अवजड वाहनांना टोल भरून येथून प्रवास करण्याचे नियोजन एसपीटीपीएल कंपनीने केले आहे. सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी व सलग लागून आलेल्या दिवसांच्या सुट्टीत या नऊपैकी मोफत वाहनांसाठी ठेवलेल्या चार रांगा हलक्या वाहनांसाठी पुरतील का, हा प्रश्नच आहे. सुमारे २० हजार वाहने शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवारच्या सकाळपर्यंत मुंबईहून बाहेर पडतात त्यामुळे वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण खारघर व कामोठे टोलनाके होऊ नये, असे नियोजन पोलिसांना व एसपीटीपीएल कंपनीला करावे लागणार आहे. अजूनही कामोठे वसाहतीमधून थेट सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी मार्ग एसपीटीपीएल कंपनीने बनविलेला नाही. कांदळवनाचे कारण पुढे करून या मार्गाचे काम ठप्प आहे. विशेष म्हणजे लहान वाहने जाण्यासाठी येथे मार्गाची सोय होऊ शकते तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्या कामोठे वसाहतीमधील प्रवासी महामार्गावर उभे राहून जीवघेणा प्रवास करतात. पावसाळ्यात हीच समस्या जटिल होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहनांसाठी व हलक्या वाहनांसाठी किती रांगा असाव्यात याबाबत कोणताही खुलासा केला नाही. अवजड वाहनांची पथकरात वाढ केल्याचेही अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे जुन्याच दराने अवजड वाहनांची करवसुली सुरू आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या नियमात राहून काम करत आहोत.
गोपाळ गुप्ता, प्रवक्ता एसपीटीपीएल कंपनी