आगामी कुंभमेळ्यात प्रत्येक तासाला गर्दीची माहिती संकलीत करून त्या अनुषंगाने वाहतूक व गर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून ‘सिम्युलेशन मॉडेल’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी सिंहस्थातील वाहतूक व गर्दीचे नियोजन या विषयावर आढावा बैठक झाली. यावेळी एमएमआरडीएचे (मुंबई) वाहतूक तज्ज्ञ मूर्ती, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मेळा अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी, उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते. सिंहस्थ काळात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल होणार आहेत. मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना होऊन ३३ भाविकांना प्राण गमवावे लागले. नाशिक व त्र्यंबक येथे सिंहस्थ कुंभमेळा शहराच्या मध्यवस्तीत भरतो. गोदावरीच्या पात्राकडे जाणारे रस्तेही अतिशय चिंचोळे असून जा-ये करणाऱ्यासाठी स्वतंत्र मार्ग नाहीत. भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील मुख्य आव्हान आहे.
या विषयावर विविध पातळीवर काम केले जात असून त्याचा एक भाग म्हणजे ‘सिम्युलेशन मॉडेल’ होय. शाही स्नान, पर्वणी यावेळी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी या मॉडेलचा उपयोग होईल. प्रत्येक तासाची गर्दीची माहिती मिळणार असल्याने प्रशासनाला काम करणे सुलभ होईल, असे डवले यांनी नमूद केले. शहरात येणारी वाहने आणि जाणारी वाहने, त्यासाठी नियोजन वाहनतळाची ठिकाणे यांचे नियोजन जाणून घेण्यात आले. एमएमआरडीचे मूर्ती यांनी आगामी सिंहस्थात या मॉडेलचा कसा वापर करता येईल याबद्दल माहिती दिली. या मॉडेलद्वारे तासागणिक गर्दीची माहिती मिळेल. त्यावरून परिस्थितीचा अंदाज बांधता येईल. या माध्यमातून गर्दीचे नियोजन कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. उपजिल्हाधिकारी पाटील यांनी वाहनतळाच्या नियोजनाबद्दल माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा