शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलीस ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवून वाहतुकीला शिस्त लावावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. दर दोन महिन्यांनी दुचाकीधारकांची तपासणी करण्याच्या नावाखाली वाहतूक पोलीस लूट करीत आहेत. विद्यार्थी, महिला तसेच ग्रामीण भागातून येणारे दुचाकीधारक यांना बडगा दाखवत लूटमार सुरू आहे. जडवाहनांना बंदी असताना ही वाहने शहरात घुसू लागल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारून फेरीवाले, रिक्षा यांना शिस्त लावून दुचाकीधारकांची होणारी लूटमार थांबवावी, शहरातील सिग्नल व्यवस्था त्वरित कार्यान्वित करावी अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे, उपाध्यक्ष उसामा पठाण, शहराध्यक्ष कनकदंडे, आदींच्या सह्य़ा आहेत.