विद्युत वितरण कंपनीत शिकाऊ उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने कामावर रुजू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अमरावती येथील स्वाभिमान वीज तांत्रिक नागरिक सेवा सहकारी संस्थेकडून लोणार येथील अप्रेंटिस मुलांची छळवणूक सुरू असून परवाना काढण्यासाठी जादा रकमेची मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याचे समजल्याने कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर परवान्याअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
लोणार येथील विद्युत वितरण कंपनीत शिकाऊ उमेदवारांना डावलून त्यांच्या जागी बाहेरील उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने रुजू करण्याचा सपाटा या संस्थेकडून सुरू आहे. उमेदवारांनी परवान्यासाठी तीन ते चार महिन्यांपासून संस्थेकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. विशेष म्हणजे, या परवान्यासाठी केवळ १ तास लागतो, परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मनमानी सुरू असून परवान्यासाठी उमेदवारांकडून पैशाची मागणी होत असल्याचे समजते. परवाने न मिळाल्याने विद्युत वितरण कंपनीत कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या ३० ते ३५ अप्रेंटिस मुलांचे तीन ते चार महिन्यांपासून पगारसुध्दा निघालेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  
लोणार उपविभागामार्फत बरेच लाईनमन सेवानिवृत्त झालेले आहेत तरीही या जागी नवीन लाईनमन भरण्यात आलेले नाहीत. कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या येथील मुलांकडे परवाने असते तर त्या जागी त्यांना भरण्यात आले असते, परंतु अमरावती येथील स्वाभिमान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे या मुलांना यापासून वंचित राहावे लागत आहे. लोणार येथील शिकाऊ उमेदवारांवर संस्थेमार्फत होणाऱ्या अन्यायामुळे या मुलांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द तीव्र असंतोष असून संस्थेच्या कामकाजाची सखोल चौकशी करून परवान्यासाठी शिकाऊ उमेदवारांना वेठीस धरणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांनी राज्याचे कामगारमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.