पोलीस दलात भ्रष्टाचार होत नाही. बदल्यांसाठी वशीलेबाजी चालत नाही. ही प्रक्रिया गुणवत्तेवर पार पडते. त्यामुळे अशा कामांसाठी कोणाच्या मागे लागू नका. आवडीच्या ठिकाणी नेमणूक मिळावी म्हणून ज्या प्रशिक्षणार्थीनी वशीला लावला नाही त्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी तसे प्रयत्न केले त्यांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, अशी प्रांजळ कबुली देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुणवत्तेवर पुढे यावे आणि चांगले काम करून सर्वसामान्यांचा आधारवड बनावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे केले. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्यावतीने आयोजित १०८ व्या दीक्षांत सोहळ्यात १५४४ उपनिरीक्षकांची तुकडी दलात समाविष्ट झाली. राज्याच्या नव्हे तर, देशाच्या इतिहासात पोलीस अधिकाऱ्यांची इतकी मोठी तुकडी समाविष्ट होण्याची ही पहिली घटना असल्याचा उल्लेखही पाटील यांनी केला. प्रशिक्षणार्थीकडून इच्छूक ठिकाणी नेमणुकीसाठी कसे प्रयत्न झाले, यावर खुद्द गृहमंत्र्यांनी प्रकाशझोत टाकल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पसरली.
सोहळ्यास राज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, अकादमीचे संचालक संजय बर्वे, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आदी उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मागील तीन वर्षांत अकादमीने राबविलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा गृहमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या कालावधीत नऊ तुकडय़ांच्या माध्यमातून तब्बल चार हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यंदाच्या दीक्षांत सोहळ्यातील तुकडीत ४६५ युवतींचा सहभाग आहे. महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्यात  महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असल्याचे पाटील यांनी नमूद केले. गडचिरोलीत महिला पोलिसांची मोठय़ा प्रमाणात भरती केल्यावर ही पद्धत संपूर्ण देशाने स्वीकारली. या माध्यमातून नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याची तयारी महिलांनी दाखवत आपली क्षमता सिद्ध केल्याचे पाटील यांनी सांगितले.
सीमेवर पहारा देणारा जवान आणि देशांतर्गत सुरक्षा राखणारे पोलीस कर्मचारी या दोघांचे काम महत्वपूर्ण आहे. दीक्षांत सोहळ्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना लगेच आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी दाखल व्हायचे होते. परंतु, वर्षभराच्या कालावधीतील खडतर प्रशिक्षण लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी या सर्वाना तीन ऑक्टोबपर्यंत सुटी देण्याची सूचना केली. या सुट्टय़ा नंतर भरून काढल्या जातील, हे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत. सतेज पाटील यांनी बदलत्या स्थितीला सामोरे जाताना पोलिसांनी संयमशील राहण्याचा सल्ला दिला. अकादमीचे संचालक संजय बर्वे यांनी अकादमीच्या कामाचा आढावा घेतला. कालसुसंगत नव्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण घेणारी ही तुकडी आहे. या तुकडीतील १२४४ जणांना नाशिक येथे तर उर्वरित ३०० प्रशिक्षणार्थीना तुरची येथे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा
सन्मान प्रशिक्षण काळात वेगवेगळ्या विषयात सवरेत्कृष्ट काम करणाऱ्या १५ प्रशिक्षणार्थिना यावेळी गौरविण्यात आले. सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची तलवार कोल्हापूरच्या राजेंद्र गुरवने तर महिलांमध्ये हा मान पुण्याच्या तेजश्री शिंदेने मिळविला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार्थिना सन्मानित करण्यात आले. इतर वेगवेगळ्या गटात अमोल कोलेकर, सुवर्णा माने, सुरेश कोराबू, मयूर भामरे, अविनाश राठोड, विलास कुटे, जुनेद खान, रोशन देवरे, सुहास कांबळे, जितेंद्र वैरागडे, प्रशांत निशानदार, विजय महाले यांचा समावेश आहे. राजेंद्र गुरव यांनी साडे नऊ वर्ष पोलीस दलात शिपाई ते गुप्तवार्ता विभागात काम केले आहे. त्यांचे वडील माजी सैनिक तर भाऊ शिक्षक आहे. एम. ए. राज्यशास्त्र विषयात शिक्षण घेणाऱ्या गुरव यांनी चांगला माणूस बनण्याची इच्छा व्यक्त केली. सवरेत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी तेजश्री शिंदेने महिलांशी निगडीत प्रश्न व गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. तेजश्रीचे वडील कारागृहात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून खात्यातंर्गत परीक्षा देऊन उच्च अधिकारी होण्याची मनिषा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader