विशेष मुलांच्या सर्वागीण विकासासाठी मुंबईमधील सात परिमंडळांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौर सुनील प्रभू यांनी केली. यामुळे विशेष मुलांना ज्ञानार्जनासाठी एक नवे दालन खुले होणार आहे.
अभिनेते रमेश देव, अभिनेत्री सीमा देव आणि अजिंक्य देव यांच्या संकल्पनेतून विशेष मुलांसाठी साकारलेल्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ लर्निग अ‍ॅण्ड डेव्हलपमेट’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘द मिडास टच’ या प्रदर्शनाचे उद्घाटन सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देव कुटुंबीय उपस्थित होते.
अजिंक्य आणि आरती यांची कन्या तनया ही विशेष मुलगी आहे. मात्र हे लक्षात आल्यानंतर न डगमगता देव कुटुंबियांनी या नैसर्गिक समस्येचा समर्थपणे सामना केला. त्यातूनच विशेष मुलांसाठी विशेष शाळा सुरू करण्याची प्रेरणा देव कुटुंबियांना मिळाली आणि महापालिकेच्या सहकार्याने त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली, असे सुनील प्रभू म्हणाले. तसेच विशेष मुलांच्या सर्वागीण विकासासाठी महापालिकेतर्फे सात परिमंडळांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘अ‍ॅकॅडमी ऑफ लर्निग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या संचालिका आरती आणि अजिंक्य देव यांनी विशेष मुलांच्या वर्गाची आणि त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विशेष मुलांची गरज लक्षात घेऊन या शाळेत सामान्यपणे प्रत्येक दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त करण्यात आला आहे. तसेच अत्यंत आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण साहित्यही येथे उपलब्ध करण्यात आले आहे. प्रामुख्याने मुलांना सहजपणे श्वास घेता यावा यासाठी उपकरणे, प्राणवायूचा पुरवठा करणारी उपकरणे, विविध प्रकारच्या हलक्या व्यायामासाठीच्या साधनसामग्रीचा त्यात समावेश आहे. मुलांच्या मेंदूचा योग्य व नैसर्गिकरित्या विकास व्हावा यासाठी या शाळेत येणाऱ्या मुलांना विशेष आहारही दिला जातो.

Story img Loader