दि. १० ते १३ दरम्यान शिबिर
देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या २००, तसेच देशसेवेसाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या २०० अशा ४०० युवा कार्यकर्त्यांंना १० ते १३ जानेवारी दरम्यान स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे दिली.
स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत अनेक कार्यकर्ते कार्य करतात, हे समाज आणि देशाच्या दृष्टीने कमी नाही, असे नमूद करून अण्णा पुढे म्हणाले की, आमच्या देशात सहा लक्ष गावे आहेत प्रत्येक गावातील एका तरूणाने संकल्प करून आपले गाव विकासासाठी निवडले व समर्पित भावनेने काम केले तर देशाचे व देशातील जनतेचे उज्वल भवितव्य दूर नाही. मात्र, असे लोक उभे राहत नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
ऑगस्ट २०११ मध्ये दिल्लीतील आंदोलनादरम्यान देशातील कोटय़वधी लोक सहभागी झाले. या आंदोलनामुळे भ्रष्टाचार संपला नसला तरी त्याबाबत लोकजागृती झाली. त्यामुळेच देशभरातून राळेगणसिद्घीत लाखो लोकांची पत्रे आंदोलनात सहभागासाठी आली. याच पत्रांमधून निवडलेल्या व आपले जीवन समाज आणि देशसेवेसाठी समर्पित करण्यासाठी तयार असणाऱ्या २०० तसेच देशसेवेसाठी वेळ देऊ शकणाऱ्या २०० कार्यकर्त्यांंना राळेगणसिद्घीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या चार दिवसांत त्यांचे प्रबोधन झाले, त्यांचे विचार दृढ झाले तर विविध राज्यांतून पुढे आलेल्या या कार्यकर्त्यांंना प्रत्येक तीन चार महिन्यांतून प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आल्याचे हजारे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रात आर्थिक पाठबळाचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. इच्छुकांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास देशव्यापी, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा राळेगणसिद्घी, ता. पारनेर, जि. अहमदनगर-४१४३०२ (पिनकोड) व बँक खाते क्रमांक ६०११८७३७९८७ एमआयसीआर कोड ४१४०१४०१२ या क्रमांकावर चेक किंवा डिमांड डाफट्रने मदत पाठविण्याचे आवाहनही हजारे यांनी केले आहे.

Story img Loader