ठाणेकरांना वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी शहरात ट्राम गाडय़ा तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते घोडबंदर मार्गावर ‘लाईट रेल ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सुरू करण्याची घोषणा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली असली तरी आयुक्तांच्या कल्पनेतील हे प्रकल्प वास्तव्यास उतरतील का, असा प्रश्न सध्या ठाणेकर प्रवाशांच्या मनात डोकावू लागला आहे. ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलावा यासाठी मोनो, मेट्रो, िरगरुटपासून अगदी जपानच्या ‘मॅग्लेव’ या चुंबकीय शक्तीवर धावणाऱ्या आधुनिक वाहतूक प्रकल्पांची घोषणा गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी झाली आहे. प्रत्यक्षात ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) गळक्या, खंगलेल्या बसगाडय़ांपलीकडे अजूनही ठाणेकरांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे राजीव यांची ट्रामगाडय़ांची घोषणा कल्पनाविलास ठरते की वास्तव याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिससारखा प्रकल्प राबवून ठाणे महापालिकेने या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पाचा अपवाद वगळता ठाण्यात वाहतूक व्यवस्थेचा कायापालट घडवून आणणारा एकही मोठा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. टीएमटी बससेवेचा उडालेला बोजवारा आणि रिक्षा चालकांचा गल्लोगल्ली असणारा मुजोर कारभार यामुळे ठाणेकर प्रवाशी अक्षरश हैराण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात ट्रामगाडय़ा आणि एलआरटी सुरू करण्याच्या राजीव यांच्या घोषणेमुळे ठाणेकर प्रवाशांच्या मनात आशेची नवी पालवी फुटली आहे. असे असले तरी यापूर्वी राणाभीमदेवी थाटात केलेल्या घोषणांचे आणि प्रकल्पांचे काय झाले, असा प्रश्नही येथील नागरिकांच्या मनात डोकावू लागला आहे. ठाणेकरांसाठी अंतर्गत वाहतुकीचे नवे दालन सुरू व्हावे यासाठी तब्बल १२ वर्षांपूर्वी शहरात िरगरूट वाहतूक प्रकल्पाची कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर अशा वेगवेगळ्या मार्गावर िरगरूटचे ११ स्थानकेही निश्चित करण्यात आली होती. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या िरगरूट मार्गावर कोणती वाहतूक व्यवस्था अंमलात आणली जावी याविषयी बराच खल झाला. तेव्हा जपानची मॅग्लेव ही चुंबकीय शक्तीवर धावणारी चार डब्यांची गाडी िरगरुटसाठी निवडण्याचा विचार सुरू झाला होता. मात्र, या प्रकल्पात सुमारे ५०० हून अधिक इमारतींचे विस्थापन करावे लागणार होते. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडला. याच काळात ठाणे शहरात सात डब्यांची लहानही मेट्रो सुरू करता येईल का, याची चाचपणीही सुरू करण्यात आली होती. यानंतर ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बससेवेचे सक्षमीकरण करण्याचा विचार नंदकुमार जंत्रे यांच्या काळात पुढे आला. या बसेससाठी स्वतंत्र्य मार्गिका आखाव्यात, असेही ठरले. त्याचेही पुढे फारसे काही झाले नाही. वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी वेळोवेळी आखण्यात आलेले प्रकल्प केवळ कागदावर राहातात, हा जुना अनुभव आहे. त्यामुळे राजीव यांच्या कल्पनेतील ट्राम यावेळी प्रत्यक्षात अवतरेल, अशी आशा ठाणेकर बाळगून आहेत.
* ठाणे शहरात मोनो आणि मेट्रो प्रकल्पांची वेळोवेळी मांडणी झाली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून तीनहात नाका ते बोरिवली दरम्यान मेट्रो सुरू करता येईल का, याची चाचपणीही यापूर्वी अनेकदा झाली आहे. मात्र, हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर नाही, असा साक्षात्कार सध्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना झाला आहे. घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली असा मेट्रो प्रकल्पही कागदावर आहे. या प्रकल्पासाठी येऊर जंगलात कारशेड उभारण्याचे ठरले आहे. महापालिकेने यासाठी लागणारे आरक्षण बदलाची प्रक्रियाही यापूर्वी पूर्ण केली आहे.
* आर. ए. राजीव यांचा ठाणे महापालिकेतील आयुक्तपदाचा कार्यकाल पुढील वर्षी जून अखेरीस संपत आहे. त्यापूर्वी ट्राम प्रकल्पाला महासभेची मंजुरी घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राजीव यांना उरकावे लागणार आहे. हा प्रकल्प अहवाल तयार करताना जागेचे संपादन, मार्गिकांची निश्चिती, खर्चाचे सविस्तर विवरण आखावे लागणार आहे. हे काम वेगाने उरकण्याचे आव्हान स्वत राजीव यांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे मार्चपर्यत प्रत्यक्षात कामास सुरू करता येईल का, याविषयी ठाणेकरांच्या मनात शंकाच आहे. हे काम आपल्या काळात सुरू होईल, याची दक्षता राजीव यांना घ्यावी लागेल. नाहीतर पूर्वीप्रमाणे आयुक्त बदलले की प्रकल्प बदलतात, असेच काहीसे होण्याची भीती आहे.
‘मुंगेरीलाल के हसीन सपने’
ठाणे शहरात ट्रामगाडय़ा तसेच एलआरटी हे वाहतूकीचे नवे पर्याय सुचविणारे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या या प्रकल्पांची खिल्ली उडविताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी राजीव यांच्या कल्पनांचा उल्लेख ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असा केला. घोडबंदर भागात स्मशानभूमी, अस्थिविसर्जन घाट, सव्र्हिस रोड अशा मूळ सुविधा राजीव यांना देता आलेल्या नाहीत. असे असताना ट्रामगाडय़ांचे स्वप्न दाखविताना ते प्रत्यक्षात कसे उतरेल, यासाठी राजीव यांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही सरनाईक यांनी व्यक्त केली. या प्रकल्पास आपला विरोध नाही मात्र ते प्रत्यक्षा उतरावेत यासाठी राजीव यांचा कार्यकाळ वाढवावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगाविला.
ठाण्यामध्ये ट्राम खरंच येणार..?
ठाणेकरांना वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी शहरात ट्राम गाडय़ा तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते घोडबंदर मार्गावर ‘लाईट रेल ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सुरू करण्याची घोषणा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली असली तरी आयुक्तांच्या कल्पनेतील हे प्रकल्प वास्तव्यास उतरतील का,
First published on: 29-11-2012 at 12:23 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tram will be comeing in thane