लातूर महापालिकेतील एलबीटीचा तिढा सुटला असल्याची माहिती महापौर स्मिता खानापुरे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या सहा महिन्यांपासून व्यापारी व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये एलबीटीवरून संघर्ष सुरू होता. १ जुलैपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. व्यापाऱ्यांच्या असंतोषानंतर एलबीटीला स्थगिती देऊन १ नोव्हेंबरपासून तो अमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाला १० दिवस दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांना बोलावून त्यांच्याशी एलबीटी दराबाबत चर्चा केली व त्यातून मार्ग काढला. एमआयडीसी वगळता उर्वरित संघटनांनी एलबीटीच्या नव्या दराबाबत महापालिकेशी तडजोडीची भूमिका घेतली असल्याचे महापौरांनी सांगितले.ही तडजोड करताना व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही व महापालिकेलाही उत्पन्न मिळेल अशी भूमिका राहील, असे त्या म्हणाल्या. १ नोव्हेंबरपासून तडजोडीचे दर शासनाने व्यापाऱ्यांना लागू करावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार बैठकीत प्रभारी आयुक्त धनंजय जावळीकर, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समिती सभापती समद पटेल, काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल उपस्थित होते.

Story img Loader