अंगभूत प्रतिभेने प्रचलीत स्वर-तालांमधून अनोखी स्वरानुभूती घडविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलापटु उस्ताद झाकिर हुसेन आणि सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या एकत्रित ‘टुगेदर’ मैफलीचा आस्वाद घेण्याचा योग ‘अथर्व मल्टिक्रिएशन्स’ आणि ‘जीवनगाणी’ या संस्थांनी ठाणेकरांसाठी जुळवून आणला आहे. रविवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सुर आणि तालांची ही जुगलबंदी रंगणार आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील षणमुखानंद सभागृहात या दोघांनी एकत्रितपणे प्रथम अशा प्रकारची ‘टुगेदर’ मैफल सादर केली होती.  उस्तादींसोबतच्या ‘टुगेदर’ मैफिलींचा हा तिय्या संस्मरणीय होईल, असा विश्वास शंकर महादेवन यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला.  काना, मात्रा आणि वेलांटय़ा आणि उकार निरनिराळे असले तरी अंतिमत: संगीताची भाषा आणि व्याकरण एकच असते, हा अनुभव हे दोन्ही कलावंत स्वतंत्रपणे आपल्या फ्यूजन मैफलींमधून श्रोत्यांना देत असतातच. हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य शैलीतील गाणी प्रभावीपणे गाणारे शंकर महादेवन मराठी भावगीत, नाटय़संगीतही तिकक्याच ताकदीने सादर करतात. गेल्या वर्षी सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेले भजन रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. अलिकडे ठाणे परिसरात वर्षांतून किमान एकदा तरी उस्ताद झाकीर हुसेन यांची मैफल होत असते. काही महिन्यांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातच उस्तादजींचे ‘सोलो’ वादन सादर झाले होते. आता ‘टुगेदर’च्या निमित्ताने या दोघांचे सादरीकरण एकत्रीतपणे अनुभविण्याचा दुग्धशर्करा योग आहे.