मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांपैकी सर्वात दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची हालअपेष्टांची साडेसाती किमान पुढील दीड वर्षे तरी चालूच राहणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांपैकी निम्म्याहून अधिक गाडय़ा २५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. या जुन्या बांधणीच्या गाडय़ांमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था चांगली नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात प्रवाशांना या कोंदट गाडय़ांमधूनच प्रवास करावा लागेल. डीसी-एसी परिवर्तनाला लागणारा विलंब, १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी आवश्यक असलेले मात्र लांबलेले प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण या कारणांमुळे डिसेंबर २०१६पर्यंत तरी हार्बर मार्गावर हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाची यशस्वी चाचणी होऊनही तीन महिने उलटत आले. मात्र अद्याप या परिवर्तनाला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. परिणामी हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. हे काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वेकडून केला जात आहे. मात्र तो प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे. त्याचबरोबर या मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे कामही सुरू आहे. मात्र वडाळा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि रे रोड येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाबाबत अडथळे आहेत.
या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर फक्त जुन्या गाडय़ाच चालवल्या जातात. डीसी प्रवाहावर चालणाऱ्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या ४६ गाडय़ांपैकी २७ गाडय़ांचे आयुर्मान २०११मध्येच उलटले होते. मात्र या गाडय़ांना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता २०१६पर्यंत या गाडय़ा चालवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी विद्युतप्रवाह सुरू झाल्यानंतरच येथे एमयुटीपी-२ अंतर्गत आलेल्या बंबार्डिअर गाडय़ा चालतील व हार्बर मार्गासाठी मुख्य मार्गावरील तुलनेने नव्या गाडय़ा उपलब्ध होतील.
मात्र या सर्वासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत हार्बर मार्गावर नव्या गाडय़ा धावणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात या जुन्या गाडय़ांमधून प्रवास करताना हाश्शहुश्श करण्याची वेळ हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांवर येणार आहे.

Story img Loader