कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत बांधकामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या आयुक्त शंकर भिसे यांनी बदल्या केल्या आहेत.   त्यांच्या आशीर्वादाने टिटवाळा, डोंबिवली पश्चिम, आयरे-कोपर-पूर्व, काटेमानिवली, कोळसेवाडी भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे दाखल झाल्या होत्या.
 ‘ग’प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी चंदुलाल पारचे यांची टिटवाळ्यात ‘अ प्रभाग अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.   डोंबिवली पश्चिमेत ‘ह’  प्रभागातील प्रभाग क्षेत्र अधिकारी लहू सोमा वाघमारे यांची पालिका शिक्षण मंडळात लेखापाल म्हणून बदली करण्यात आली आहे. या प्रभागात लेखापाल विनय कुळकर्णी यांची प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘अ’ प्रभागात प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती करून घेण्यात यशस्वी झालेले रवींद्र गायकवाड यांना पुन्हा महापालिका मुख्यालयात बिनपदाच्या खुर्चीवर आणण्यात आले आहे.  ‘ड’ प्रभागाचे वादग्रस्त परशुराम कुमावत यांना पुन्हा ‘ग’ प्रभागात नियुक्त करण्यात आले आहे. घनकचरा विभागातील लेखापाल अरुण वानखडे यांची ‘ड’ प्रभाग अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिक्षण मंडळातील लेखापाल शांतिलाल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साहाय्यक आयुक्त अनिल लाड हे ‘क’ प्रभागाचा पदभार स्वीकारत नसल्याने प्रशासन त्यांचे लाड का पुरवीत आहे, असे प्रश्न  उपस्थित केले जात आहेत.

Story img Loader