जेमतेम खरीप हंगाम सुरू झालेला असताना विदर्भातील सात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने खरीप हंगामासाठी तयार केलेल्या नियोजनाच्या अंमलबजावणीचे तीन तेरा वाजणार आहेत. खरिपाची पेरणी अजून पूर्ण झालेली नाही. कृषी अधिकारी सरकारने तयार केलेल्या कृषी आढाव्यानुसार कामांच्या तयारीला लागलेले आहेत. अशातच विदर्भातील सात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे सरकारच्यादृष्टीने जिल्हा कृषी अधीक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असला तरी खरीप नियोजनाच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.
यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, गोंदिया व बुलढाणा जिल्ह्य़ांतील कृषी अधीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. मंत्र्यांच्या शिफारशीनुसार कृषी अधीक्षकांच्या बदल्या झाल्याचीच कृषी विभागात चर्चा आहे. वाशीमचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी साहेबराव दिवेकर यांची परभणीला याच पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर अमरावतीच्या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पोपट शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.
बुलढाणा येथील ‘आत्मा’ प्रकल्पाचे संचालक सदाशिव माने यांची रत्नागिरीला याच पदावर बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश सांगळे यांची पुणे येथील शेती महामंडळात मुख्य कार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कोल्हापूरच्या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश भताने यांना पाठविले आहे.
गोंदियाच्या ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक जे.पी. शिंदे यांची पुण्याला आत्माच्या सहसंचालकपदी बदली करण्यात आली. चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अशोक कुरिल यांची गोंदियाला याच पदावर बदली करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या आत्माचे प्रकल्प संचालक एम. आर. बन्सोड यांना चंद्रपूरला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी म्हणून पाठविले आहे. यवतमाळचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी काशीनाथ तरकसे यांची रायगडला याच पदावर बदली झाली आहे. यवतमाळला या पदावर औरंगाबादच्या आत्मामधून दत्तात्रेय गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे. कृषी विभागात जिल्ह्य़ाचे प्रमुखपद, आत्मा, गुणवत्ता नियंत्रण, मृद्संधारण, रोजगार हमी योजना विभागातील पदे लाभाची समजण्यात येत असल्याने या पदासाठी बहुसंख्य कृषी अधिकारी इच्छुक असतात. यासाठी मंत्र्यांच्या शिफारशीसह फिल्डिंग लावून ते लाभाच्या पदावर बदली करून घेण्यासाठी धडपड करीत असतात. ऐन खरीप हंगामाच्या प्रारंभीच झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नियोजनावर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा