ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी, दुर्गम भागात शिक्षण विभागात गेली सात ते आठ वर्षे केंद्रप्रमुख म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे या बदल्या होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने दुर्गम भागातील या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीही आदिवासी भागातील केंद्रप्रमुखांच्या विनंती बदल्यांकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण विभागातर्फे अलीकडे पदवीधर शिक्षक, बढतीच्या कालमर्यादेपर्यंत पोहोचलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून बढत्या दिल्या. प्रत्येक गटात या बढत्या देण्यात आल्यामुळे दुर्गम भागातून विनंती बदलीवर शहरी, ग्रामीण भागांत येणाऱ्या शिक्षकांना आता रिक्त जागा शिल्लक राहिलेली नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने प्रथम केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करून मग स्थानिक पातळीवरील अनुभवसंपन्न शिक्षकांच्या बढतीची प्रक्रिया करणे आवश्यक होते. शिक्षण विभागाच्या या गोंधळाचा फटका दुर्गम भागांत काम करणाऱ्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांना बसला आहे. येथील केंद्रप्रमुखांच्या विनंती बदल्या करून मग शिक्षकांमधील स्थानिक पातळीवरील बढतीची प्रक्रिया पूर्ण आवश्यक होते. ही बाब शिक्षण विभागाच्या अलीकडे निदर्शनास आल्यामुळे बदल्यांविषयी शिक्षण विभाग बोलण्यास तयार नसल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता प्रशासनाने प्रशासकीय, विनंती बदल्यांच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण त्यामध्ये आदिवासी भागातील विनंती बदल्यांच्या मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा क्रमांक लागतो की नाही याकडे दुर्गम भागांतील शिक्षकांचे लागले आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांच्या कार्यालयात व भ्रमणध्वनीवर गेले दोन दिवस सतत संपर्क करूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.  
दुर्गम भागांत आठ वर्षे सेवा
जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू भागांत गेल्या सात ते आठ वर्षांपासून केंद्रप्रमुख म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी परिसरांत नियुक्ती मिळावी म्हणून वेध लागले आहेत. या अधिकाऱ्यांची कुटुंबे शहरी, ग्रामीण भागांत राहतात. नोकरी दुर्गम आदिवासी भागात असल्याने या अधिकाऱ्यांनी कुटुंबापासून दूर राहून दुर्गम भागांत आठ वर्षे सेवा दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना दुर्गम भागांतून आपल्या बदल्या चालू वर्षी शहरी, ग्रामीण भागांत होतील, अशी अपेक्षा होती. गेल्या वर्षी या अधिकाऱ्यांनी शहरी, ग्रामीण भागांत बदलीची मागणी केली होती. त्याकडे शिक्षण विभागाने कानाडोळा केला होता. शिक्षक संघटनेने या अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या तातडीने कराव्यात म्हणून निवेदने दिली आहेत. त्या पत्राची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा