शोभा बोंद्रे यांनी एका गुजराती व्यावसायिकावर लिहिलेल्या ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या ‘नॉट ओन्ली पोटेल’ या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘बेस्ट सेलर’ ठरला आहे. दोन महिन्यांत इंग्रजी अनुवादित पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली असून ‘फ्लिपकार्ट’या संकेतस्थळावर पुस्तकाला ‘फाइव्ह स्टार’ नामांकन मिळाले आहे. पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘रॅण्डम हाऊस’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेने ‘धंदा-हाऊ गुजरातीज् डू बिझनेस’ या नावाने प्रकाशित केला आहे.
इंग्रजीत अनुवादित झालेल्या या पुस्तकाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रस्तावना असून पुस्तकाची ओळख अमिताभ बच्चन यांनी करून दिलेली आहे. या पुस्तकाची एक आवृत्ती पाच हजार प्रतींची असून तिसरी आवृत्ती १० जुलै रोजी बाजारात आली आहे.
पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी प्रख्यात असलेल्या ‘फ्लिपकार्ट’या संकेतस्थळावरही या पुस्तकाला चांगली मागणी असून संकेतस्थळाच्या ‘बेस्ट सेलर’ यादीतही हे पुस्तक गेले आहे. अन्य संकेतस्थळांवरही या पुस्तकाला चांगली मागणी आहे.
शोभा बोंद्रे यांनीच मुंबईच्या डबेवाल्यांवर लिहिलेले ‘मुंबईचा अन्नदाता’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याचा इंग्रजी अनुवाद ‘मुंबईज् डबावाला’ या नावाने ‘वेस्टलॅण्ड’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या पुस्तकालाही चांगली मागणी आहे. ‘धंदा- हाऊ गुजरातीज् डू बिझनेस आणि ‘मुंबईज् डबावाला’ या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद शलाका वाळिंबे यांनी केला आहे.
या दोन्ही पुस्तकांची परीक्षणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही दैनिकात तसेच मासिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ‘नॉट ओन्ली पोटेल’चा इंग्रजी अवतार ‘बेस्ट सेलर’ ठरला ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून आपल्या मराठी भाषेचा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया लेखिका शोभा बोंद्रे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा