एखाद्या पुलाचे काम झाल्यानंतर त्या पुलासाठी आलेला खर्च, टिकाऊ क्षमता याविषयीची माहिती सर्वाना व्हावी म्हणून एखाद्या फलकाची उभारणी होणे हे आजपर्यंत नागरिकांनी पाहिले आहे. परंतु एखाद्या नगरसेवकाने आपण केलेल्या रस्त्याच्या कामासाठी लागलेला कालावधी, कामाचा खर्च, टिकाऊ क्षमता, रस्त्याची लांबी व रुंदी अशी सर्व माहिती फलकाद्वारे सर्वासाठी उपलब्ध करून देणे विरळाच.
नाशिकमध्ये प्रभाग क्र. २१चे नगरसेवक विक्रांत मते यांनी असा अभिनव प्रयोग राबविला असून अशा प्रकारची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देणारे ते शहरातील पहिलेच नगरसेवक असावेत.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मते यांनी मतदारांना पारदर्शी काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून आपण प्रभागात केलेल्या प्रत्येक कामाची संपूर्ण माहिती नागरिकांना व्हावी म्हणून कामाचा ठेकेदार व मनपा अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण कामाचे विवेचन असलेले फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले आहे.
यापूर्वी नगरसेवक मते यांनी प्रभागातील नागरिकांना विकास कामांचा आढावा देण्यासाठी विभागवार तिमाही बैठका, रस्त्यांचा टिकाऊपणा कायम राहण्यासाठी दर १०० मीटरवर वीज  आणि दूरध्वनी जोडणीसाठी पाइप टाकून ठेवणे, पूर्वसूचना देऊनही रस्ता खोदल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे, गोदावरीचे प्रदूषण थांबावे म्हणून सुमारे ५०४८ गणेशमूर्ती संकलित करण्याचा उपक्रम राबविणे, स्वखर्चाने रस्ता स्वच्छतेसाठी यंत्राचा वापर अशी कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे गोदावरी स्वच्छतेसाठी निर्माल्य संकलन बोट (पाण्यावरील घंटागाडी) सुरू झाल्याने संपूर्ण गोदापात्र स्वच्छ झाले आहे.
नगरसेवक विक्रांत मते यांचा आदर्श इतर नगरसेवकांनीही ठेवावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.