डोंबिवली पश्चिमेतील कायम गर्दी असणाऱ्या पंडित दिनदयाळ चौक, ताश्कंद मॅचिंग सेंटर, विष्णुनगर पोलिस ठाणे तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहाजवळ रिक्षा चालक बेकायदेशीरपणे वाहने उभे करीत असल्याने मोठय़ाप्रमाणावर वाहतुक कोंडी होत असून  यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठय़ाप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्षा चालकांवर कारवाई करावी तसेच या परिसरांमध्ये कायमस्वरूपी वाहतुक पोलीस तैनात करावेत अशी मागणी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केली आहे. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दीनदयाळ चौक, विष्णुनगर पोलीस ठाणे, प्रसाधनगृह हे तिन्ही रस्ते रेल्वे स्थानकाशी जोडले गेले आहेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारा प्रवासी याच मार्गाने बाहेर पडतो. परंतु, या मार्गावर रिक्षा चालक बेकायदेशीरपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिसरात वाहतूक पोलिस उभे असतात ते या रिक्षा चालकांवर कारवाई करीत नाहीत असा आरोप नगरसेविका धात्रक यांनी केला आहे. उपोषणाचा इशारा किंवा वाहतूक विभागाला पत्र दिले की फक्त दोन ते तीन दिवस कारवाई करण्यात येते. दुपारी १२ ते ४ आणि संध्याकाळी ८ ते १२ या वेळेत हे रिक्षा चालक रस्ते अडवून बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई न केल्यास ३० जून रोजी आपण उपोषण करणार असल्याचे धात्रक यांनी सांगितले.