‘वाहतुकीच्या नियमांचे पालन करा’ असा संदेश ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर व्यंगचित्र रेखाटलेल्या भेटकार्डामधून पुणेकरांना देतात. त्यांच्या या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात करण्यात आला. या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे.
या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नेचर वॉक संस्थेचे अनुज खरे, इंडिया अगेन्स्ट करप्शनचे दीपक भराडिया, रवी आठवले, मिलिंद जोशी, तसेच एका अपघातात आपला मुलगा विनायक यास गमावलेले त्याचे आई-वडील गुरुसिद्धाय्या स्वामी, सौ. शशी स्वामी आदी सहभागी झाले होते.
नळ स्टॉप चौकातील चारही रस्त्यांवर कार्यकर्ते थांबले होते व लाल सिग्नल झाला की वाहन चालकांना व्यंगचित्र असलेले भेटकार्ड देऊन ‘दिवाळीच्या शुभेच्छा! वाहतूक नियमांचे पालन करा’ असा संदेश देत होते. पुणेकरही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन, नियम  पालन करतो-करूच, असे वचन देत होते. मंगळवारपासून ३ दिवस सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत तेंडूलकर म्हणाले, ‘‘पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे. मात्र, याबाबत प्रशासन किंवा परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपण काय करु शकतो, याचा सर्वानी विचार करण्याची आणि तो कृतीत बदलण्याची गरज आहे. यातूनच १२ वर्षांपूर्वी मी एकटय़ाने जगजागृतीची मोहीम हाती घेतली आणि आज अनेक संस्था, नागरिक या उपक्रमात सहभागी होतात ही समाधानाची बाब आहे.’’