पूर्वद्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलांची उभारणी केल्यानंतरही वाहतूक कोंडीचे आगार बनलेल्या तीनहात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन या ठाण्यातील तीन महत्त्वाच्या नाक्यांवरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय अखेर महापालिकेने घेतला असून या भागातील वाहनांची वाढती संख्या, अपुरी ठरणारी सिग्नल यंत्रणा यावर तोडगा शोधण्यासाठी या परिसराचा नव्याने वाहतूक विकास आराखडा तयार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा तसेच भविष्यात वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच ठाणे शहर, कळवा, मुंब्रा या भागांतील ३०० वाहतूक नाक्यांचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाचा पहिला टप्पा म्हणून पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन नाक्यांचा वाहतूक सुधारणा आराखडा तयार केला जाणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील प्रमुख शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न जिकिरीचा बनला आहे. अरुंद रस्ते, वाहनतळांचे कमी पर्याय, रस्त्यांच्या कडेला उभी करण्यात येणारी वाहने यांसारख्या कारणामुळे ठाणे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येते. ठाणे महापालिका तसेच वाहतूक पोलिसांनी या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. तरीही वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे अद्याप जमलेले नाही. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा या तीनही शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचा नव्याने अभ्यास करून दूरगामी योजना राबविण्याशिवाय पर्याय नाही, या मताशी महापालिका तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक र्सवकश अभ्यास केला असता तब्बल ३०० नाक्यांवर भविष्यात वाहनांची मोठय़ा प्रमाणावर कोंडी होऊ शकते, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे या नाक्यांवर भविष्यात वाढणारी वाहने, सध्याची परिस्थिती, त्यावर योजण्यात येणाऱ्या उपायांचा र्सवकश अभ्यास करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पहिला टप्पा म्हणून पूर्वद्रुतगती महामार्गावरील तीन प्रमुख जंक्शनचा अभ्यास करण्यात येणार आहे.
नितीन कंपनी नाका कोंडीमय
ठाणे शहराच्या पश्चिमेकडील बाजूस ये-जा करताना पूर्वद्रुतगती महामार्ग ओलांडावा लागतो. या महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची कोंडी वाढू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर जागोजागी उड्डाणपूल उभारले आहेत.
याशिवाय घोडबंदर मार्गावरही उड्डाणपुलांच्या उभारणीचे काम सुरू आहे. असे असले तरीही मूळ शहरातून वागळे, वर्तकनगर तसेच इतर भागांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने या तीनही जंक्शनवर दररोज वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तीनहात नाका तसेच कॅडबरी जंक्शन परिसरात सिग्नल यंत्रणेचा बऱ्यापैकी वापर होत असला तरी नितीन कंपनी जंक्शन परिसरात वाहतूक व्यवस्थेने बेशिस्तीचे टोक गाठले आहे.
या ठिकाणी वाहतुकीचे नियम पोलिसांच्या डोळ्यादेखत धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र दिसत असल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहराला दुभाजून जाणाऱ्या या तीन नाक्यांचा नव्याने वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सविस्तर अभियांत्रिकी अभ्यास करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या नाक्यांवरील वाहतुकीची सद्यस्थिती, वाहतुकीवर होणारे परिणाम, भविष्यात वाढणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवासासाठी लागणारा वेळ, तसेच कोंडीमुक्त प्रवासाकरिता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मांडण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा