उपनगरी रेल्वे स्थानकांमध्ये प्रसाधनगृहांची सोय करा, जादा तिकीट खिडक्या उघडा, रेल्वे स्थानकातील वेश्या व्यवसाय थांबवा, महिलांसाठी प्रथम वर्गाचा संपूर्ण डबा द्या या आणि यासारख्या अनेक मागण्यांचा भडीमार प्रवाशांनी बुधवारी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर बोरिवली स्थानकामध्ये केला. निमित्त होते रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा जनता दरबार! या समस्या सोडविण्याबरोबरच मे महिन्यापर्यंत बोरिवली, अंधेरी, विलेपार्ले आणि दादर येथे सरकते जिने लावण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगून जनतेचा प्रक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम उपनगरातील दहिसर ते मालाड रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोरिवली स्थानकामध्ये हा जनता दरबार भरविण्यात आला होता. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांच्याबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दहिसर ते मालाड दरम्यानच्या स्थानकांवर प्रसाधनगृहांची सोय हवी, ही प्रसाधनगृहे स्थानकाच्या टोकाशी न उभारता प्रवाशांची वर्दळ असेल अशा ठिकाणी उभारावीत, दहिसरच्या फलाट क्रमांक एकच्या उत्तरेकडे तिकीट खिडकी तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, मुंबई सेंट्रलप्रमाणे बोरिवली येथे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या आरक्षणाची माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावण्यात यावे, महिला प्रसाधनगृहाबाहेर महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, बोरिवलीहून चर्चगेटसाठी फलाट क्रमांक सहावरून गाडी सोडण्यात यावी, फलाटांवरील स्टॉल्स हटविण्यात यावेत, फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि प्रत्येक स्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या, असा मागण्या प्रवाशांनी केल्या.
या सर्व मागण्यांवर आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू असे सांगत महाव्यवस्थापकांनी या तक्रारींच्या भडीमारातून आपली सुटका करून घेतली.
अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना सोयीचे असलेले सरकते जिने लावण्याची घोषणा यावेळी महाव्यवस्थापकांनी केली. पश्चिम रेल्वेवर तब्बल ३२ ठिकाणी हे जिने लावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यापैकी पहिले चार जिने मे महिन्यापर्यंत लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा