ठाणे शहरात विकास प्रकल्पाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरूच असून महापालिका प्रशासनाने ३१८ वृक्ष तोडण्यासंबंधीचे ६० नवे प्रस्ताव तयार केले आहेत. विशेष म्हणजे, २३ प्रस्ताव बिल्डरांचे असून त्यामध्ये २५४ वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अद्याप गठीत होऊ शकलेली नसल्यामुळे मानीव (डिम) परवानगीच्या अधिकाराखाली या बिल्डरधार्जिण्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा घाट घातल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी महापालिकेने ५६ प्रस्तावांमध्ये सुमारे ४३० वृक्ष तोडण्यास मान्यता दिली असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. त्यामुळे या नव्या प्रस्तावांनाही मंजुरी दिल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरातील विकासकामात अडथळे ठरणारे वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या वृक्ष विभागाने ३१८ वृक्ष तोडण्यासाठी ६० नवे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यामध्ये २५४ वृक्ष तोडण्यासंबंधीचे २३ प्रस्ताव बिल्डरांचे आहेत. त्यामुळेच महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी दिली. वृक्ष प्राधिकरणाकडे प्राप्त झालेल्या अर्जावर ६० दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. प्राधिकरणाने यासंबंधी निर्णय घेतला नाहीतर त्या प्रस्तावांना मानीव (डिम) परवानगी ग्राह्य धरण्याची तरतूद आहे. असे असले तरी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण समिती राजकीय साठमारी तसेच न्यायालयीन फेऱ्यात अडकल्याने अद्याप गठीत होऊ शकलेली नाही. तरीही मानीव (डिम) परवानगीच्या नावाखाली बिल्डरांच्या हितासाठी महापालिकेने नव्या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा घाट घातला आहे, असे तायडे यांनी सांगितले. मुळात वृक्ष प्राधिकरण समितीच गठीत नाही, त्यामुळे मानीव परवानगी देता येऊ शकत नाही, अशी हरकत तावडे यांनी घेतली आहे. यापूर्वी महापालिकेने ५६ प्रस्तावांमध्ये सुमारे ४३० वृक्ष तोडण्यास मान्यता दिली असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्यासंबंधीही न्यायालयात दाखल आहे. असे असतानाही या नव्या प्रस्तावांना बेकायदेशीररीत्या मंजुरी दिल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अर्निबध वृक्षतोड
कोणताही धोका नसताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात सोसायटीच्या आवारातील तब्बल १२ मोठी झाडे तोडली, असा आरोप रघुनाथनगरमधील श्री आनंदनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीने केला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे सोसायटीने तीनदा लेखी तक्रारीही केल्या, पण त्याची दखल घेतली नाही, असा आरोप सोसायटीच्या सभासदांनी केला आहे.