* विरोधानंतरही प्रस्तावाला हिरवा कंदील
*  शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव ?
*  महापालिकेतील ‘गोल्डन गॅंग’ पुन्हा चर्चेत
*  शिवसेनेच्या विरोधानंतरही महापौरांचा पाठींबा
ठाणे शहरातील ५७ ठिकाणी असलेल्या सुमारे ५५० झाडांची कत्तल करण्यास हिरवा कंदील दाखविताना महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेले ‘सहमती’चे राजकारण सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनू लागला असून सत्ताधारी शिवसेनेतील काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या विरोधाला वाकुल्या दाखवून या वृक्ष कत्तलीसाठी भारतीय जनता पक्षातील काही ठराविक नगरसेवकांनी शिवसेनेसोबत असलेली ‘युती’ पणाला लावल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावास मंजुरी मिळू नये, यासाठी सभागृहात एकीकडे जोरदार गोंधळ सुरू असतानाही काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या दबावापुढे हा प्रस्ताव घाईघाईत मंजूर झाल्याचे चित्र पुढे आल्याने झाडांच्या या कत्तलीभोवती संशयाचे धुके अधिकच गडद होऊ लागले आहे.
 नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत घोडबंदर मार्गावरील लोढा संकुलातील ९१ झाडांच्या कत्तलीचा मुद्दा मोठय़ा प्रमाणावर गाजला. या कत्तलीस परवानगी देऊ नये, अशी मागणी करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरुवातीला सभागृह डोक्यावर घेतले. मात्र, चर्चेचा सूर प्रस्तावाच्या नामंजुरीच्या दिशेने सरकताच गोंधळातच वृक्षांच्या कत्तलीस मंजुरी दिल्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी जाहीर केले. परवानगीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावातील अनेक वृक्ष यापूर्वीच तोडण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी केला. असे असतानाही या गंभीर आरोपांची चौकशी करण्याची तसदीही यावेळी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेतील नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाचा या प्रस्तावांना मान्यता देण्यास विरोध होता. मात्र, भारतीय जनता पक्षातील काही नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या मंजुरीचा आग्रह धरल्याने महापालिकेतील अस्थिर राजकीय परिस्थितीपुढे विरोधी सूर लावणाऱ्या शिवसेना नगरसेवकांनाही गप्प बसविण्यात आल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
काय होता प्रस्ताव?
महापालिकेतील राजकीय परिस्थितीमुळे वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे वृक्षतोडीचे महत्त्वाचे प्रस्ताव थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. शहरातील ५७ ठिकाणच्या ५५१ झाडांच्या कत्तलीचे हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये घोडबंदर मार्गावरील लोढा संकुलातील ९१ झाडांच्या कत्तलीचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. मात्र, शिवसेना तसेच काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी या प्रस्तावांना विरोध करत काही झाडांची यापूर्वीच कत्तल करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप यावेळी केला. महापालिकेमार्फत एकीकडे हरित ठाण्याची जाहिरात केली जाते आणि दुसरीकडे ५५१ झाडांच्या कत्तलीची परवानगी दिली जाते हे योग्य नाही, असा मुद्दा काही नगरसेवकांनी उपस्थित केला. लोढा संकुलाच्या विकासासाठी ९१ झाडांच्या कत्तलीस परवानगी देण्यापूर्वी सविस्तर पाहणी अहवाल सादर होणे आवश्यक आहे, असा मुद्दा शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच यातील काही प्रकरणे न्यायालयात असल्याने ही परवानगी देऊ नये, असा सूरही लावण्यात आला.
विरोधानंतरही मंजुरी
शिवसेना तसेच काँग्रेसचे ठराविक नगरसेवक या प्रस्तावाविरोधात गंभीर आरोप करत असताना सभागृहातील काही ज्येष्ठ नगरसेवक मात्र प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आग्रही दिसत होते. ६० दिवसांच्या आत हे प्रस्ताव मंजूर केले नाहीत, तर कायद्याने त्यांना मंजुरी गृहीत धरली जाईल, असा मुद्दा सभागृह नेते नरेश म्हस्के आणि विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी मांडला. यावेळी झालेल्या गोंधळात प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. दरम्यान, घाईगडबडीत दिलेल्या या मंजुरीमागे महापालिकेतील सर्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांच्या सहमतीचे राजकारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. एरवी फुटकळ विषयांवरही चौकशी समित्या नेमणाऱ्या सभागृहाने वृक्षांच्या कत्तलीसंबंधी होत असलेल्या आरोपांकडे का दुर्लक्ष केले, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

लोढा गृहसंकुलातील ९१ झाडांच्या कत्तलीची परवानगी देताना भाजप नगरसेवकांनी कोणतेही दबावतंत्राचे राजकारण केलेले नाही, असा दावा भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी वृत्तान्तशी बोलताना केला. पक्षीय स्तरावर अशा स्वरूपाच्या प्रस्तावाची कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच ठाण्यातील युती अभेद्य असल्याने शिवसेनेला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच नाही, असेही लेले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वृक्षतोडीच्या प्रस्तावास दिलेली मंजुरी योग्य असून यासंबंधी नको त्या वावडय़ा उठविल्या जात आहेत, असा दावा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला.

Story img Loader