शिवकार्य गडकोट मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्य़ात किल्ले संवर्धनाचे कार्य केले जात असून किल्ले रामसेजवर कार्यकर्त्यांनी श्रमदान करून सुमारे ७०० रोपे लावली. या मोहिमेत येथील नेचर क्लबच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. कमी पाण्यावर जगू शकतील अशी जंगली रोपे लावण्यात आली असून या रोपांची काळजी घेण्याचे आश्वासन आशेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे. शहर व परिसरातील गडकोटप्रेमींनी शिवकार्य मोहीम सुरू केली आहे.
या माध्यमातून प्रारंभी किल्ले खैराईपाली येथील शिवकालीन तळ्याची खोदाई व स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर मावळ्यांच्या शौर्याचा इतिहास मिरविणाऱ्या उत्तरेकडील रामसेज किल्ल्याचा पायथा तर थेट माथ्यापर्यंत रोपे लावण्यात आली. आशेवाडीचे सरपंच दौलत बगर यांच्या हस्ते रोपे लावण्यास सुरुवात करण्यात आली. एका दिवसात ७०० रोपे लावण्यात आल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख राम खुर्दळ यांनी दिली. यापुढेही जिल्ह्य़ातील गडकोटांवर या मोहिमेंतर्गत श्रमदानातून होईल तितके काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी ग्रामसेवक किशोर गलांडे, नेचर क्लबचे आनंद बोरा यांच्यासह मोहिमेतील अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी मोहिमेच्या माध्यमातून शिवभक्तांना रामसेजवर नेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या वेळी गडकोटांचे चित्र प्रदर्शन, नाटिका, परिसंवाद याद्वारे गडांच्या बिकट अवस्थेकडे शिवभक्तांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

Story img Loader