सर्व आरोपी फरार
सिरोंचा वनविभागांतर्गत झिंगानूर-कल्लेड जंगलात वनतस्करांनी वनकर्मचाऱ्यांना झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वनकर्मचाऱ्यांची सुटका केली.
वनविभागाचे काही कर्मचारी झिंगनूर-कल्लेड जंगलात गस्तीवर असताना वनतस्करांनी ए.जी. अलोणे, ए.पी. मडावी, जुमनाके या वनकर्मचाऱ्यांना झाडाला बांधून त्यांना काठीने मारहाण केली. तस्करांनी वनमजूर सोनटक्के यांनाही मारहाण केली. कर्मचाऱ्यांना वनतस्करांकडून मारहाण होत असल्याचे बघून उर्वरित सहा वनरक्षकांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच १२ वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
जंगलात अंदाजे १५० वनतस्कर बैलगाडय़ांसह सागवानाची तस्करी करीत असल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांना बघताच सर्व वनतस्करांनी घटनास्थळावरून पळ काढला.
वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून दोन बैल, एक बैलगाडी व काही सागवानी लाकडे जप्त केली.
घटनेसंदर्भात वनविभागाने झिंगानूर पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा