मांडव कोसळून कामगाराचा मृत्यू
गांधी नगरातील प्रसिद्ध हेरिटेज मंगल कार्यालयात जेवण वाढपीचे काम करणाऱ्या एका तरुणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मंगल कार्यालयाच्या मालकासह तिघाजणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेरिटेज मंगल कार्यालयात लक्ष्मण सुधाकर सोनकवडे (वय १९, रा. गोगाव, ता. अक्कलकोट) हा जेवणवाढपीचे काम करीत होता. दिवसा तो आयटीआय संस्थेत तंत्रशिक्षण घेत असे. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो हेरिटेज मंगल कार्यालयात काम करीत असे. रात्री लक्ष्मण सोनकवडे व त्याच्या सहकाऱ्यांनी जेवणवाढपीचे काम केले. मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांना घराकडे परत जाता आले नाही. तेव्हा लक्ष्मण व इतर कामगार रात्री मंगल कार्यालयाच्या लोखंडी मंडपात व्यासपीठावर झोपले.
 परंतु रात्रभर पावसामुळे लोखंडी मंडपाचे पाईप कोसळून अंगावर व डोक्यावर पडल्याने लक्ष्मण सोनकवडेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य कामगार किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास केला असता यात मंगल कार्यालयाचे मालक मनोज कांतिलाल शहा यांच्यासह व्यवस्थापक सिद्रामप्पा शिवलिंगप्पा टाके (रा. किणी, ता. अक्कलकोट) व मंडप कंत्राटदार नारायण गणपत लांडगे (रा. एमडीए रोड, बावधन, पुणे) यांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले. लोखंडी मंडपाची उभारणी भक्कम व मजबूत झाली की नाही, याची खातरजमा केली नाही. त्यामुळे दुर्घटना घडून त्यात लक्ष्मण सोनकवडे याचा मृत्यू झाल्याचा ठपका शहा यांच्यासह तिघांवर पोलीस तपासात ठेवण्यात आला आहे.