गोंडवाना विद्यापीठात शिक्षणासोबतच आदिवासी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन व्हावे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी संस्कृती अभ्यास व संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार मारोतराव कोवासे, आमदार दीपक आत्राम, अतिरिक्त आदिवासी आयुक्त पल्लवी दराडे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, डॉ. नामदेव कोकोडे उपस्थित होते.
पिचड म्हणाले की, आदिवासी जमात ही मूळ निवासी असून त्यांची संस्कृती जगाला दिशा देणारी आहे. त्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आदिवासी संस्कृतीचे आचार-विचार जगासमोर आणण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने संशोधनाच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे. गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक बाबी व मागण्यांसंदर्भात मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन देऊन या विद्यापीठातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आला पाहिजे. केंब्रिज आणि जागतिक विद्यापीठात गेला पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात कुलगुरू आईंचवार यांनी गोंडवाना विद्यापीठात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती विशद करून पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेप्रमाणे येथे केंद्र असावे. यासाठी स्वतंत्र इमारतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाला ८ कोटीचा निधी प्राप्त झाला असून आदिवासी विभागाकडून अधिक मदतीची गरज आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनायक इरपाते यांनी, तर आभार डॉ. नामदेव कोकोडे यांनी मानले.
दरम्यान, सेमाना देव मार्गावरील नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या शासकीय इंग्रजी माध्यम शाळेला मधुकरराव पिचड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार मारोतराव कोवासे, आमदार दीपक आत्राम, अप्पर आदिवासी आयुक्त पल्लवी दराडे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, मुख्य वनसंरक्षक के.एस.के. रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा