माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथे समाधिस्थळी बुधवारी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. देशमुख कुटुंबीयांसह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, चाहते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, बंधू आमदार दिलीपराव देशमुख, पुत्र आमदार अमित, अभिनेते रीतेश व धीरज, सुना, बहिणींसह कुटुंबातील इतरांनी पुष्प अर्पण केले. चाहत्यांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंत आवळे, आमदार बाबासाहेब पाटील व वैजनाथ िशदे, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, विक्रमसिंह चौहान, रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, ‘मांजरा’चे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपाध्यक्ष जगदीश बावणे, ‘विकास’चे उपाध्यक्ष विजय देशमुख, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डी. बी. लोहारे, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मंगलप्रभा घाडगे, विश्वंभर मुळे, विकास बँकेचे अध्यक्ष व्ही. पी. पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर भोसले व शिवाजी पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पोलीस उपअधीक्षक बी. जी. गायकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, काकासाहेब पाटील, लक्ष्मण मोरे, बसवकल्याणचे माजी आमदार मुळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वृषाली कोरडे व शशिकांत देशमुख यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. रामानुज रांदड व बाळकृष्ण धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला’ अशी भजने सादर झाली. सकाळी ९ वाजता मांजरा कारखान्यावर रामराव ढोकमहाराज यांचे कीर्तन झाले. उदगीर, जळकोट, चाकूर येथेही अभिवादन सभा झाल्या. पत्रकार भवनात पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर, चंद्रकांत मिटकरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले आदी उपस्थित होते. दुपारी सिद्धेश्वर मंदिरातील विलासराव देशमुख यात्री निवासात भैयूमहाराजांचे ‘विलासरावांचे जीवनकार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. संपूर्ण लातूरभर चौकाचौकांत विलासरावांना अभिवादनाचे डिजिटल फलक झळकत होते. बाभळगावच्या समाधिस्थळी प्रार्थना सभा असताना राज्याच्या अनेक ठिकाणांहून लोक दिवसभर समाधिस्थळी दर्शन घेत होते. विलासरावांना जाऊन वर्ष झाले तरी त्यांच्या चाहत्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही, याचे दर्शन बाभळगावात पुन्हा एकदा झाले.
‘देवाची देवानेच चोरी केली’
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातून विलासरावांचे चाहते सकाळीच दाखल झाले. त्यांच्या वाहनांवर असलेला ‘देवानेच आमच्या देवाची चोरी केली’ हा मजकूर लक्ष वेधून घेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा