मुलाचे अपहरण करुन जिवे मारण्याची धमकी देत तब्बल दीड कोटी रु पयांच्या खंडणी प्रकरणी गावभाग पोलिसात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवा नेता मोहन पांडुरंग मालवणकर (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी खासगी शिक्षक मधुकर रामचंद्र फुलारी यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कोल्हापुरातील दोघांचा समावेश आहे. कोटय़वधी रुपयांची खंडणी मागितल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने वस्त्रनगरीत पुन्हा खळबळ माजली आहे.
या प्रकरणी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पाटील मळा सांगली रोड येथे राहणारे मधुकर रामचंद्र फुलारी (वय ६०) हे खासगी क्लासेस घेतात. ८ मे २०१२ रोजी आर्थिक व्यवहारातून त्यांचा मुलगा विनायक फुलारी याला नारायणराव गणपतराव जाधव (रा. कळंबा ता. करवीर) व अभिजित तुळशीदास जाधव (रा. राजारामपुरी १२ वी गल्ली कोल्हापूर) यांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगली रोडवरील बिग बझार समोरुन जबरदस्तीने चारचाकी गाडीत घालून कोल्हापूर येथे नेले होते. अभिजित जाधव याच्या राजारामपुरीतील राहत्या घरातील खोलीत विनायकला कोंडून मारहाण करण्यात आली होती. तसेच ९ मे २०१२ रोजी मोहन मालवणकर याने फ़िर्यादी मधुकर फुलारी यांच्या खासगी क्लासेसमध्ये जाऊन, नारायण व अभिजित यांनी तुमचा मुलगा विनायक याचे अपहरण केले आहे. ते त्याला जिवंत सोडणार नाहीत असे सांगून फुलारी यांना मालवणकर याच्या शेवरलेट ऑप्ट्रा या गाडीत घालून रंगा अपराध (रा. रुकडी ता. हातकणंगले) याने कोल्हापुरातील पाचबंगला परिसरात असणाऱ्या नारायण जाधव याच्या मालकीच्या यश टायर्स या दुकानात नेले. तेथे नारायण जाधव, अभिजित जाधव, मोहन मालवणकर, रंगा अपराध, नदीम भाई, समीर भाई या सहा जणांनी तलवारीचा धाक दाखवून मधुकर फुलारी यांना जिवे मारण्याची भीती घालून शिवीगाळ केली. फ़िर्यादी व त्यांचा मुलगा विनायक यांच्याकडून हातकणंगले हद्दीतील मधुकर फुलारी यांचे मयत बंधू आण्णाभाऊ फुलारी यांचे नावे असलेल्या साडेआठ एकर जमिनीचे खरेदीबाबतचे संचकार करारपत्र जबरदस्तीने लिहून घेऊन त्यापोटी प्रत्येकी ३० लाख रुपयांच्या दोन पावत्या लिहन घेतल्या. त्यांच्याकडील २ लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडून घेतली. अपहृत विनायक याच्या नावाचे व सहीचे स्टेट बँक ऑफ़ पटीयाला कोल्हापूर शाखेचे ९० लाख रुपयांचे १० धनादेश, विनायक याच्या हातातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा तसेच 3 हजार रुपयांचे  रॅडो कंपनीचे घडय़ाळ काढून घेतले. या प्रकरणी शिक्षक मधुकर फुलारी यांनी कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री मधुकर फुलारी यांनी नारायण जाधव, अभिजित जाधव, मोहन मालवणकर, रंगा अपराध, नदीभाई, समीर भाई व अन्य दोघे अशा ८ जणांच्या विरोधात खंडणी प्रकरणी फ़िर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी मोहन मालवणकर याच्यासह आणखी एकास ताब्यात घेतले आहे. पूर्वाश्रमीचा शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या आणि नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या मोहन मालवणकर याचा समावेश आहे. दरम्यान, उद्या शनिवारपासून मनसेच्यावतीने सदस्य नोंदणीला प्रारंभ करण्यात येणार होता. त्यासाठी मोहन मालवणकर याने गावभाग पोलिस ठाण्याशेजारी मंडप उभारला आहे. पण आजच्या कारवाईमुळे सदस्यांची नोंदणी होणार का, याचीच चर्चा सुरु  होती.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute tributary abduction
Show comments