ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्रसंरक्षण दलासाठी मुंबई वाईल्ड लाईफ काँझर्वेशन ट्रस्टकडून देणगी स्वरूपात ‘ट्रॉप कॅरिअर’ हे वाहन मिळाले असून यात बसून एकत्रितरित्या गस्त घातली जाणार आहे, तर ३४ सायकलींवर बसून वनरक्षक गस्त घालणार आहेत.
पट्टेदार वाघ व बिबटय़ांच्या वास्तव्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आज जागतिक ओळख आहे. पावसाळ्यात शिकारी सक्रीय होत असल्याने तीन महिने हा प्रकल्प अंशत: बंद आहे. त्यामुळे यावर्षी विशेष व्याघ्रसंरक्षण दलाकडे ताडोबाच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. ताडोबात संरक्षण दल सक्रीय झाले असून गस्त करतांना अडचणी येऊ नयेत म्हणून वाईल्ड लाईफ काँझर्वेशन ट्रस्ट यांच्याकडून देणगी स्वरूपात ‘ट्रॉप कॅरिअर’ हे चार चाकी वाहन भेट देण्यात आले आहे. हे वाहन विशेष व्याघ्रसंरक्षण दल ताडोबाचे मुख्य क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते एसटीपीएफच्या मुख्य वनक्षेत्रपाल पुष्पलता बेंडे यांना मोहुर्ली येथे हस्तांतरित करण्यात आले. या वाहनामुळे विशेष व्याघ्रसंरक्षण दलाला जंगलात एकत्रितरित्या प्रभागी गस्त करून वन व वन्यजीव संरक्षण करण्यास निश्चित मदत होणार आहे. ताडोबा प्रकल्पात या वाहनाच्या समावेशामुळे वन्यजीव संरक्षण यंत्रणा बळकट होण्यास सहकार्य झाले आहे.
या कार्यक्रमात वाईल्ड लाईफ काँझर्वेशन ट्रस्ट या संस्थेकडून देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या हक्र्यूलस कंपनीच्या ३४ सायकलींचे वाटप ताडोबा, कोळसा व मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांना गस्तीकरिता करण्यात आले आहे. सायकलींच्या उपलब्धतेमुळे क्षेत्रीय वनरक्षकांना त्यांच्या नियतक्षेत्रात गस्त घालण्यास सोयीचे होणार आहे.
 या कार्यक्रमाचे आयोजन मोहुर्लीचे वनक्षेत्रपाल एस.यु.शिंदे यांनी केले. मान्सून गस्तीचा कार्यक्रम व वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जारी करण्यात आलेला अतिदक्षता इशारा, या पाश्र्वभूमीवर वाहनाचे वाटप झाल्याने क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात ताडोबा कोअरचे उपसंचालक सुजय दोडल, विभागीय वन अधिकारी जी.के. वशिष्ठ, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एस. पडवे व एसटीपीएफचे कर्मचारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा